पत्नीला वाचविण्यासाठी बापाकडून मुलाचा खून
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2023 11:36 AM2023-05-27T11:36:38+5:302023-05-27T11:38:17+5:30
बेसखेडा येथील घटना, तत्पूर्वी पोलिस ठाण्यात धाव
बेलोरा (अमरावती) : चांदूर बाजार पोलिस ठाण्याच्या हद्दीत बेसखेडा येथे आईला मारहाण करणाऱ्या मद्यपी मुलाला आवर घालताना बापाने डोक्यात हाणलेल्या विटेमुळे त्याचा मृत्यू झाला. त्यापूर्वी जमिनीवर निपचित पडलेल्या या मुलाविरुद्ध आई-वडील पोलिस ठाण्यात तक्रार देऊन आले होते.
ऋषभ सुनील पाथरे (२८) असे मृताचे नाव आहे. सुनील भाऊसाहेब पाथरे (५८) असे आरोपी वडिलांचे नाव आहे. याबाबत ऋषभचा भाऊ निखिल याने नोंदविलेल्या फिर्यादीनुसार, व्यसनाच्या आहारी गेलेला ऋषभ हा घरी आई-वडिलांकडे पैशांची मागणी करून वारंवार वाद उकरून काढत होता.
२४ मे रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास मद्यपान करून घरी आल्यानंतर त्याने आई मंगला हिच्यासोबत वाद घातला. बेफाम झालेल्या ऋषभने विटांचे तुकडे फेकून व डोक्यात काठी घालून मंगलाला रक्तबंबाळ केले. त्याला आवर घालण्यासाठी रागाच्या भरात सुनील यांनी त्याच्या डोक्यात वीट हाणली. यामुळे तो घरापासून काही अंतर चालत जाऊन जमिनीवर कोसळला आणि निपचित पडला. तथापि, मद्याच्या अमलात असल्यामुळे तो कोसळला असावा, असा समज करून घेत सुनील व मंगला यांनी चांदूरबाजार पोलिस ठाणे गाठून ऋषभविरुद्ध तक्रार नोंदविली. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हादेखील दाखल केला.
यानंतर गावी स परतलेल्या पती-पत्नीने घरी न जाता मेहुण्याचे घर गाठले आणि तेथेच रात्र काढली. सकाळी घरी आले तेव्हादेखील ऋषभ निपचित पडून होता. त्याला हलविले तेव्हा त्याचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. याबाबत माहिती मिळाल्यानंतर ठाणेदार अशोक जाधव, उपनिरीक्षक वैभव चव्हाण, विनोद इंगळे, नितीन डोंगरे, राहुल गौरखेडे, अजय पाथरे, गौरव पुसदकर यांनी घटनास्थळ गाठले. पंचनाम्यानंतर आरोपी सुनीलला अटक करण्यात आली. घटनास्थळाला उपविभागीय पोलिस अधिकारी अतुल नवगिरे यांनीदेखील भेट दिली. दरम्यान, गुरुवारी चांदूर बाजार पोलिसांकडून सुनीलला न्यायालयापुढे हजर करण्यात आले. त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. पुढील तपास ठाणेदार अशोक जाधव यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास होत आहे.