कलेवर पाहताच वडील बेशुद्ध; आईला हृदयविकाराचा धक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 11:25 PM2019-02-25T23:25:15+5:302019-02-25T23:25:40+5:30
सोमवारी सकाळी १० च्या सुमारास बारावीचा पेपर देण्यासाठी घराबाहेर पडलेल्या मुलाचे कलेवर पाहून वडील बेशुद्ध पडले, तर आईला हृदयविकाराचा जबर धक्का बसला. गावही निस्तब्ध झाले. सोमवारी सकाळी लगतच्या दिया फाट्याजवळ १७ वर्षीय आदित्य नायडे याला भरधाव ट्रॅक्टरने उडविले. या घटनेने छोट्याशा दिया गावात स्मशानशांतता पसरली.
पंकज लायदे।
लोकमत न्यूज नेटवर्क
धारणी : सोमवारी सकाळी १० च्या सुमारास बारावीचा पेपर देण्यासाठी घराबाहेर पडलेल्या मुलाचे कलेवर पाहून वडील बेशुद्ध पडले, तर आईला हृदयविकाराचा जबर धक्का बसला. गावही निस्तब्ध झाले. सोमवारी सकाळी लगतच्या दिया फाट्याजवळ १७ वर्षीय आदित्य नायडे याला भरधाव ट्रॅक्टरने उडविले. या घटनेने छोट्याशा दिया गावात स्मशानशांतता पसरली.
दिया येथील आदित्य प्रकाश नायडे व त्याचा मित्र आकाश चिरंजीलाल मावसकर हे दोघे दहेंडा येथे इयत्ता बारावीचा भौतिकशास्त्राचा पेपरसाठी सोमवारी दिया येथून निघाले होते. रस्त्याने जात असताना दिया फाट्याजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रॅक्टरने त्यांच्या दुचाकीस जबर धडक दिली. त्यात आदित्यचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती गावात पसरताच मृत आदित्यच्या नातेवाइकांनी घटनास्थळावर धाव घेतली. सदर घटनाक्रम बघून आदित्यचे वडील प्रकाश नायडे घटनास्थळीच बेशुद्ध पडले. त्यांना तातडीने रुग्णालात नेण्यात आले. तथापि, घरी असलेली त्याची आई सीमा नायडे यांना मुलाच्या मृत्यूची माहिती मिळताच त्या हृदयविकाराचा धक्का आल्याने खाली कोसळल्या. त्यांना उतावली येथील रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले. तसेच आदित्यचा भाऊ अनिकेत हा सारखा विलाप करीत होता. मुळात हुशार असलेल्या आदित्यने इयत्ता अकरावीत विज्ञान शाखा निवडून नियमित अभ्यास व नियोजनबद्ध परीक्षेची जोरदार तयारी केली होती. बारावीच्या परीक्षेत उत्तम गुण घेऊन त्याने उच्च शिक्षणाची कास धरली होती. मात्र काळाने झडप घातली अन् होत्याचे नव्हते झाले. त्याच्या अकाली मृत्यूने नायडे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
अनिलची मन:स्थिती नसताना दिला बारावीचा पेपर
आदित्य आणि अनिल मावस्कर हे जीवाभावाचे मित्र होते. सोमवारी ते दोघेही एकाच दुचाकीने परीक्षा केंद्राकडे निघाले. मात्र दिया गावाकडे परत जाताना अगदी गावाजवळच ट्रॅक्टरने त्यांच्या दुचाकीस धडक दिली. आदित्य दुचाकी चालवत होता. या अपघातात अनिलही जखमी झाला. तो अपघाताचा प्रत्यक्षदर्शी असल्याने जमावाने त्याला आधी पोलीस तक्रार देण्याचा आग्रह धरला. अपघाताची तक्रार दिल्यानंतर आणि जीवाभावाचा मित्र गणावल्याने अनिलची मनस्थिती बिघडली. मात्र आईवडील व मित्राच्या आग्रहास्तव त्याने पोलीस ठाण्यातून सरळ दहेंडा येथील परीक्षा केंद्र गाठून जखमी अवस्थेत बारावीचा पेपर सोडविला.
अन् ते धावत सुटले
आदित्यच्या कुटुंबात वडील प्रकाश, आई सीमा, भाऊ अनिकेत व बहीण रोशनी असे सदस्य आहेत. प्रकाश नायडे हे दिया गावातच मत्सव्यवसाय करतात. आदित्यचा अपघातात जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळताच ते घटनास्थळावर अक्षरश: धावून गेले अन् त्याला बघताच बेशुद्ध झाले. आपला भाऊ गेला यावर आदित्यच्या भावंडांचा विश्वासच बसेना.