वडिलाचा मृतदेह घरात, मुलगा बारावीच्या परीक्षेला केंद्रात; पेपर सोडवून आल्यावर अंत्यसंस्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2023 07:05 AM2023-02-26T07:05:30+5:302023-02-26T07:10:06+5:30
क्रूर नियतीनेही घेतली प्रतीकची परीक्षा
संजय जेवडे
नांदगाव खंडेश्वर (अमरावती) : नियतीच ती... परीक्षा घेणारच... बारावीला असलेल्या प्रतीकने परीक्षेच्या मध्येच असाच कठीण पेपर सोडविला... हाडाची काडं करणाऱ्या वडिलांच्या शब्दाखातर तो त्यांचे शव घरी सोडून रडवेल्या चेहऱ्याने परीक्षा केंद्रावर पेपर द्यायला गेला. परत आला तेव्हा आपल्या मृत पित्याला अग्नी द्यायचा होता. ही हृदयद्रावक घटना आहे नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील वेणी गणेशपूर येथील विद्यार्थ्याची.
वेणी गणेशपूर येथील प्रतीक ओमप्रकाश चवरे हा नांदगाव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीचा हा विद्यार्थी आहे. रात्री २ ते ३ च्या दरम्यान हृदयविकाराने वडिलांचा मृत्यू झाला. दुसरे दिवशी त्याचा सकाळी ११ वाजता बारावीचा मराठीचा पेपर होता. त्यामुळे तो पहाटे साडेतीन वाजता अभ्यासाला उठला. चारच्या सुमारास वडिलांजवळ गेला असता, त्याला कसलाच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्याने घरातील इतर कुटुंबीयांना जागे केले. शेजाऱ्यांसह गावातील अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे जिल्हा सेवा अधिकारी अंगद इतापुरे यांना अवगत करण्यात आले. मात्र, उपचारासाठी धावपळ करायच्या आधीच प्रतीकचे वडील हृदयविकाराने हे जग सोडून गेले होते.
सकाळी ११ वाजता बारावीचा पेपर होता. बाहेरगावचे नातेवाईक येणार असल्याने अंत्यसंस्काराचे सोपस्कार पेपरआधी उरकले जाणे शक्य नव्हते. ही बाब लक्षात घेऊन गावातील काही नागरिकांनी त्याच्या वडिलांच्या कष्टाची जाणीव करून देत त्याला पेपरला पाठविले. मामासोबत तो रडत-रडतच परीक्षा केंद्रावर आला. तेथील शिक्षकांना ही घटना कळताच त्यांनीही त्याचे सांत्वन केले. धीर देण्याचा प्रयत्न केला. पण, जन्मदाताच सोडून गेल्याने अश्रूंचा बांध त्याला आवरता येत नव्हता. जन्मदात्याच्या आठवणीत नयनातील अश्रू लपवित त्याने पेपर सोडविला. दुपारी दोन वाजता पेपर सोडून तो घरी परतताच त्याला वडिलांचे अंत्यसंस्कार करावे लागले. क्रूर नियतीने त्याची कठोर परीक्षाच घेतली. शेतकरी वडिलांपश्चात प्रतीकसह कुटुंबात आई व पाचव्या वर्गात शिकणारी बहीण आहे.