मुलाची वरात परतण्यापूर्वीच पित्याचा ईहत्याग!
By admin | Published: February 10, 2017 12:05 AM2017-02-10T00:05:44+5:302017-02-10T00:05:44+5:30
कर्करोगाशी झुंजणाऱ्या पित्याची अंतिम ईच्छा म्हणून ‘त्याने’ तत्काळ विवाह उरकण्याचा निर्णय घेतला.
संदीप मानकर दर्यापूर
कर्करोगाशी झुंजणाऱ्या पित्याची अंतिम ईच्छा म्हणून ‘त्याने’ तत्काळ विवाह उरकण्याचा निर्णय घेतला. सारे काही ठरल्याप्रमाणे पारही पडले. पण, सुनमुख पाहण्याची लालसा डोळ्यांत ठेऊनच ‘त्या’ पित्याने प्राणत्याग केला आणि पंचक्रोशीतील नागरिक हळहळले. मुलाची वरात घरी पोहोचण्यापूर्वीच पित्याचा मृत्यू झाल्याने नवरीच्या गृहप्रवेशाऐवजी घरधन्याच्या अंत्यसंस्काराची तयारी करण्याची वेळ तराळ कुटुंबावर आली.
म्हणतात ना, ‘कोण दिवस येई कसा कोण जाणतो’ असाच काहीसा प्रकार तराळ कुटुंबासमवेत घडला. तालुक्यातील सामदा येथील सदन कास्तकार अनंतराव तराळ (५५) यांना मागील २० वर्षांपासून कर्करोेग झाला होता. ते औषधोपचार आणि ईच्छाशक्तीच्या बळावर तग धरून होते. मात्र, मागील काही दिवसांपासून त्यांचा आजार जास्तच बळावला होता. एकुलता एक मुलगा मेहेरदीप याचे दोनाचे चार हात आपल्या डोळ्यांदेखत व्हावे, अशी त्यांची इच्छा होती. पित्याची दिवसेंदिवस ढासळत चाललेली प्रकृती पाहून मेहेरदीपने तातडीने विवाह करण्याचा निर्णय घेतला. ठरल्याप्रमाणे गुरुवारी निवडक नातेवाईकांसोबत तो खामगाव येथे वधुमंडपी पोहोचला. दुपारच्या मुहूर्ताला विवाह पार पडला आणि लगेच पित्याच्या निधनाची दु:खद वार्ता त्यांच्या कानी पडली. एकीकडे विवाहाचा आनंद व दुसरीकडे पित्याच्या निधनाचे दु:ख असा विचित्र प्रसंग मेहेरदीपसह तराळ कुटुंबियांवर ओढवला. वरात घरी परतताच अनंतराव तराळ यांची अंत्ययात्रा निघाली. कुटुंबियांच्या आक्रोशाने वातावरण गहिवरले होते.
दर्यापुरातील घटना : नव्या नवरीच्या गृहप्रवेशाऐवजी घरधन्याच्या अंत्यसंस्काराची वेळ
सूनमुख पाहण्याची इच्छा अपूर्णच
४दर्यापूर तालुक्यातील हसतमुख व्यक्तिमत्व अनंतराव तराळ यांना घशाचा कर्करोग होता. तेव्हा त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. योग्य औषधोपचार व प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर त्यांनी बरीच वर्षे तग धरला. परंतु मुलाचे लग्न झाल्यानंतर सुनमुख पाहण्यापूर्वीच त्यांनी जगाचा निरोेप घेतला. यामुळे परिसरातील नागरिकही हळहळ व्यक्त करीत होते. अंत्ययात्रा निघणार असल्याने नववधुला शेजारच्या घरात काही वेळ थांबविण्यात आले होते.