कृत्रिम पाणीटंचाईला सदोष पाईपलाईन कारणीभूत?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:12 AM2021-04-26T04:12:12+5:302021-04-26T04:12:12+5:30
परतवाडा : शहरात नको त्या ठिकाणी अमृतची पाईपलाईन चंद्रभागेच्या पाईपलाईनला जोडल्यामुळे शहरात दोन्ही पाईपलाईनमधून एकाच वेळी पाणी फिरत आहे. ...
परतवाडा : शहरात नको त्या ठिकाणी अमृतची पाईपलाईन चंद्रभागेच्या पाईपलाईनला जोडल्यामुळे शहरात दोन्ही पाईपलाईनमधून एकाच वेळी पाणी फिरत आहे. परंतु या फिरत्या पाण्याची व शहरात अंथरल्या गेलेल्या वितरण व्यवस्थेतील पाईपलाईनची माहिती कार्यरत अभियंत्यांकडे नाही. यामुळे वितरण व्यवस्थेतील दोष याअभियंत्यांच्या हाती लागत नाहीत. या अमृतच्या पाईपलाईनमुळे शहरातील पाणीपुरवठ्याचा बट्ट्याबोळ झाला आहे.
शहरवासीयांना पाणीपुरवठा करण्यास ती अपयशी ठरली आहे. ती चंद्रभागेच्या वितरण व्यवस्थेतही अडथळे निर्माण करीत आहे. या अमृतमुळे सर्वच त्रस्त असून, अमृतच्या कामाची चौकशी केली जावी. त्यातील उणिवा शोधून त्या निकाली काढल्या जाव्यात. उर्वरित शिल्लक कामे संबंधित ठेकेदाराकडून पूर्ण करून घ्यावी. तोपर्यंत ठेकेदाराला प्रलंबित कामाचे बिल अदा केले जाऊ नये. अमृतमधील घोळ निस्तारून नागरिकांना पाणी उपलब्ध करून देण्याचे निर्देश राज्यमंत्री बच्चू कडू यांनी अचलपूर सर्किट हाऊसवर घेतलेल्या बैठकीत नगरपालिका प्रशासनाला एक वर्षापूर्वीच दिले होते. यात राज्यमंत्री चांगलेच आक्रमक झाले होते. पण अजूनही नगरपालिका प्रशासनाकडून अमृत योजनेतील घोळ निस्तारल्या गेलेला नाही.
ठेकेदार मिळत नाही!
पाणीपुरवठ्याची कामे करण्याकरिता नगरपालिकेला ठेकेदारच मिळत नाहीत. कंत्राटदार निविदा काढूनही भरत नाहीत. चार ते सात वेळा फेरनिविदा काढाव्या लागतात. जबरदस्तीने एखाद्याला पकडून आणून त्याच्या अटी मान्य करून निविदा भरून घ्याव्या लागत आहे. यात पांढऱ्या पुलाचे काम मागील एक वर्षापासून रखडले आहे. जयस्तंभपासून तहसीलपर्यंत अचलपूर शहराकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरणाचे काम दोन वर्षांपासून रखडले आहे. रस्त्याचे काम करताना त्रासदायक ठरत असलेली पाईपलाईन शिफ्ट करण्याबाबत ठेकेदाराकडून नगरपालिकेला पत्र देण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तसे नगरपरिषदेला सुचविले आहे. पण नगरपालिकेकडून अद्याप पाईपलाईन शिफ्ट करण्यात आलेली नाही.
कंत्राटदाराला जेव्हा जाग येते!
कंत्राटदाराला जेव्हा जाग येते, तेव्हा तो रस्त्याचे कुठेतरी खोदकाम सुरू करतो. अवघ्या ५० मीटरच्या खोदकामात चार ठिकाणी जेसीबीकडून पिण्याच्या पाण्याची ती पाईपलाईन फुटते. अवघ्या एक-दीड फुटावरील ही पाईपलाईन जागोजागी लिकेजमुळे नागरिकांना नव्याने पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य पाईपलाईनसह वितरण व्यवस्थेतील पाईपला ठिकठिकाणी गळती लागली आहे. यातून लाखो लिटर पाणी वाया जात आहे.