मातोश्री डिस्ट्रीब्युटरवर एफडीएची धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2017 12:07 AM2017-07-02T00:07:03+5:302017-07-02T00:07:03+5:30
पंधरा दिवसांसाठी परवाना निलंबित केल्यानंतरही व्यवसाय सुरू ठेवणाऱ्या मातोश्री डिस्ट्रीब्युटवर अन्न व औषधी प्रशासनाने धाड टाकून सुमारे २ लाखांचा शेड्युल औषधी साठा जप्त केला आहे.
दोन लाखांचा औषधीसाठा जप्त : परवाना निलंबनानंतरही सुरू होता व्यवसाय
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : पंधरा दिवसांसाठी परवाना निलंबित केल्यानंतरही व्यवसाय सुरू ठेवणाऱ्या मातोश्री डिस्ट्रीब्युटवर अन्न व औषधी प्रशासनाने धाड टाकून सुमारे २ लाखांचा शेड्युल औषधी साठा जप्त केला आहे. २७ जून रोजी झालेल्या या राजकमल चौकातील बग्गा मार्केटस्थित मातोश्री डिस्ट्रीब्युटरचा परवाना १५ ते २९ जूनपर्यंतच्या ालावधीकरिता निलंबित करण्यात आला होता.
मातोश्री डिस्ट्रीब्युटर या व्यापारी प्रतिष्ठानात पोल्ट्री फार्मच्या पक्षांसाठी लागणारी औषधी विक्री केली जात होती. बडनेरा येथील रहिवासी संदीप ऊर्फ पंकज राजेंद्र दारोकार यांनी काही महिन्यापूर्वी पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांसाठी मातोश्रीमधून काही औषधी खरेदी केल्या होत्या. त्या औषधी पक्षांना दिल्यानंतर दारोकार यांच्या तब्बल ३ हजार कोंबड्या दगावल्या. मुदतबाह्य औषधींमुळे कोंबड्या दगावल्याचा आरोप दारोकार यांनी मातोश्री डिस्ट्रीब्युटरच्या संचालकावर केला होता. यासंदर्भात दारोकार यांनी १७ जानेवारी २०१७ रोजी अन्न व औषधी प्रशासनाकडे तक्रार नोंदविली. एफडीएच्या औषधी निरीक्षकांनी मातोश्री डिस्ट्रीब्युटरवरची तपासणी व चौकशीअंती त्यांना कारणे दाखवा नोटीससुद्धा बजावली होती. त्याअनुषंगाने मातोश्री डिस्ट्रीब्युटरचा परवाना पंधरा दिवसांकरिता निलंबित करण्यात आला. मात्र, दरम्यान मातोश्री डिस्ट्रीब्युटर प्रतिष्ठानातून औषधी विक्री होत असल्याची तक्रार दारोकार यांनी एफडीएकडे केली. त्याअनुषंगाने एफडीएचे प्रभारी सह आयुक्त प्रकाश शेंडे यांच्या मार्गदर्शनात औषधी निरीक्षक सी.के. डांगे व उमेश घरोटे यांनी मातोश्री डिस्ट्रीब्युटर प्रतिष्ठानात बनावट ग्राहक पाठवून औषधी खरेदी करण्यास सांगितले. या पडताळणीदरम्यान मातोश्रीमधून औषधी विक्री सुरूच असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार औषधी निरीक्षकांनी मातोश्रीवर धाड टाकून २ लाखांच्या शेड्युल औषधीचा साठा जप्त करून सिलबंद केला. आता पुढील कारवाई एफडीएमार्फत सुरु करण्यात आली. मातोश्रीला पुन्हा नोटीस बजावली जाणार आहे.