संचारबंदीत सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे भय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2020 05:00 AM2020-04-08T05:00:00+5:302020-04-08T05:01:08+5:30
टवलारची लोकसंख्या तीन हजारांच्या घरात असून, तीन वॉर्डांत हे गाव विभागले गेले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता जंतुनाशक औषधांच्या तीन फवारण्यासह ब्लिचिंग पावडरचीही फवारणी करण्यात आली आहे. पाठीवरच्या पंपासह फॉगिंग मशीनने फवारणी करतानाचा लोकसहभागातून ट्रॅक्टरद्वारे गावात फवारणी पूर्णत्वास नेण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : अचलपूर तालुक्यातील टवलार ग्रामपंचायत अंतर्गत संचारबंदीत गावातील दहा सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेजच्या भीतीपोटी संचारबंदीत गावात कुणीही विनाकारण फिरकत नसल्याचे निदर्शनास येत आहे. विनाकारण भटकणारेही या कॅमेऱ्याच्या दहशतीमुळे गावातच आपल्या घरातच थांबत आहेत.
दरम्यान राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगढसह मुंबई, पुणे येथून गावात परतलेल्या ३७ लोकांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता गावपातळीवर सरपंच शीला तायडे, उपसरपंच सुनील वरखडे, सचिव योगेश्वर उमक, ग्रामपंचायत कर्मचारी प्रमोद गाडगे, दिनेश पेठे, आकाश डोंगरे, पोलीस पाटील, अॅड. अभिजित कुंभारकर, आरोग्यसेवक दुरगुडे, आरोग्य पथक, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका व मदतनीस, बचतगट, शिक्षकांसह गाव समिती लक्ष ठेवून आहे.
टवलारची लोकसंख्या तीन हजारांच्या घरात असून, तीन वॉर्डांत हे गाव विभागले गेले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता जंतुनाशक औषधांच्या तीन फवारण्यासह ब्लिचिंग पावडरचीही फवारणी करण्यात आली आहे. पाठीवरच्या पंपासह फॉगिंग मशीनने फवारणी करतानाचा लोकसहभागातून ट्रॅक्टरद्वारे गावात फवारणी पूर्णत्वास नेण्यात आली आहे.
गावातील रविवारचा आठवडी बाजारासह मंदिर, मस्जिद बंद असून घरूनच नमाज अदा केली जात आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळले जात आहे. गृहभेटींवर भर देण्यात आला आहे. ग्रामपंचायतमधील साऊंड सिस्टीममधून गावकऱ्यांना मार्गदर्शन केल्या जात आहे. जनजागृती केली जात आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही गावाला भेट देऊन मार्गदर्शन केले आहे. गावकऱ्यांशी संवाद साधला आहे.