डास वाढल्याने डेंग्यूची भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 01:06 AM2019-04-22T01:06:10+5:302019-04-22T01:06:42+5:30
शहरात डांसाचा उच्छाद वाढल्याने पुन्हा जीवघेण्या डेंग्यूची भीती निर्माण झालेली आहे. डासाच्या त्रासामुळे अमरावतीकरांची झोप उडाली आहे. दिनचर्येची कामे सोडून डासांचा बंदोबस्त करण्यात अनेकांना वेळ गमावावा लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहरात डांसाचा उच्छाद वाढल्याने पुन्हा जीवघेण्या डेंग्यूची भीती निर्माण झालेली आहे. डासाच्या त्रासामुळे अमरावतीकरांची झोप उडाली आहे. दिनचर्येची कामे सोडून डासांचा बंदोबस्त करण्यात अनेकांना वेळ गमावावा लागत आहे.
गेल्या वर्षात डेंग्युच्या प्रकोपाने अमरावतीकर हैराण झाले होते. डेंग्युमुळे अनेकांचा गेला, तर दीडशेवर नागरिकांना रुग्णालयात उपचार घ्यावा लागला. चांगल्या पाण्यात उत्पत्ती होणारी ही डेंग्यू डासाची प्रजात यंदाच्या उन्हाळ्यात पुन्हा तोंड वर काढण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात बळावली आहे. आता उन्हाळ्यातील दिवसांमध्ये कुलरचा वापर वाढल्यामुळे डासांचे प्रमाण अधिक वाढले आहे. त्यामुळे डेंग्यूचा उच्छाद वाढण्यापूर्वीच महापालिका प्रशासनाने ठोस उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे. मात्र, अद्यापपर्यंत महापालिकेकडून कोणतेही ठोस पाऊल उचलले गेले नसल्याचे दिसून येत आहे. एकीकडे स्वच्छतेकडे दुर्लक्ष तर दुसरीकडे जनजागृतीचा अभाव असल्याचे चित्र शहरात दिसत आहे. डासांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे सायंकाळनंतर घर असो की कार्यालये कुठेही बसणे अवघड झाले आहे. कार्यालयीन कामकाजात डासांचा सर्वाधिक अडसर निर्माण झाला असून, डांसाचा बंदोबस्त लावण्यातच अर्धाअधिक वेळ द्यावा लागत आहे. यावर उपाय म्हणून परिसर स्वच्छ व धूर फवारणी करणे गरजेचे असल्याचे काहींचे मत आहे.
या परिसरात डासाचा उच्छाद
शहरातील बहुतांश परिसरात डासांचा उच्छाद वाढल्याची स्थिती आहे. मोर्शी रोडवरील जिल्हा स्टेडियम परिसर, प्रशांतनगर, नवाथेनगर, अंबाविहार, सातुर्णा, कॅम्प परिसर, महेंद्र कॉलनी याशिवाय अनेक परिसरात डासांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे.
स्वच्छतेकडे दुर्लक्ष
सांडपाण्याच्या नाल्यांच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष असल्यामुळे डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. त्यातच घराघरांत लागलेल्या कुलरमुळे डासांचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनासह नागरिकांनी नाल्यांच्या व कुलरमधील पाण्याची योग्य ती विल्हेवाट लावणे अनिवार्य झाले आहे.