पुन्हा डेंग्यूच्या उद्रेकाची भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 05:00 AM2020-07-27T05:00:00+5:302020-07-27T05:01:09+5:30
कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या सुरुवातीच्या काळात स्वच्छतेची गाडी रुळावर आली होती. मात्र, त्यानंतरच्या काळात परिस्थिती ‘जैसे थै’ झालेली आहे. कुणाचाही वचक या विभागावर नसल्याने कंत्राटदारांचे फावले आहे. आयुक्त कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये व्यस्त आहेत; उपायुक्तांना याविषयी काहीच सोयरसुतक नाही, अशी स्थिती असल्याने या विभागात मनमानी कारभार सुरु आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : महापालिका क्षेत्रात कोरोनाचे संकट दिवसेन्दिवस गडद होत असताना पावसाळ्यापूर्वी सफाई न झाल्याने ठिकठिकाणी नाल्या तुंबल्या आहेत. अनेक भागांमध्ये डबकी साचली. येथून आता डेंग्यूचा उद्रेक होण्याची भीती निर्माण झाली आहे. ओला-सुका कचरा एकत्र असल्याने पर्यावरणाच्या मानकांचे उल्लंघन होत आहे. यावर ताण म्हणजे, दैनंदिन स्वच्छतेऐवजी तिसऱ्या ते चौथ्या दिवशी कचºयाचे संकलन होत आहे. यामुळे महापालिका क्षेत्रात स्वच्छतेची वाट लागली आहे.
कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या सुरुवातीच्या काळात स्वच्छतेची गाडी रुळावर आली होती. मात्र, त्यानंतरच्या काळात परिस्थिती ‘जैसे थै’ झालेली आहे. कुणाचाही वचक या विभागावर नसल्याने कंत्राटदारांचे फावले आहे. आयुक्त कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये व्यस्त आहेत; उपायुक्तांना याविषयी काहीच सोयरसुतक नाही, अशी स्थिती असल्याने या विभागात मनमानी कारभार सुरु आहे. बडनेरा प्रभागात वैयक्तिक शौचालय प्रकरणात रोज नवनवीन प्रकार बाहेर येत असल्याने महापालिका प्रशासन कसे चालते, हे जगजाहीर झाले. या प्रकरणात दोन एफआयआर झाले. आता समितीचा अहवाल आल्यानंतर विभागात पाणी कुठवर मुरले, ते बाहेर येणार आहे.
महापालिका क्षेत्रातील २२ प्रभाग अन् तीन बाजारांसाठी कंत्राटदार निश्चित झाले. मात्र, त्यांच्याकडून दैनंदिन कचरा संकलन होतो की नाही, यावर कुणाचेच नियंत्रण नाही. कोरोना प्रादुर्भावाचे काळात एप्रिल-मे महिन्यात सर्व काही ठीकठाक होते. जसजशी रुग्णसंख्या वाढली, प्रशासन प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये गुंतले, या बाबीकडे पूर्णत: दुर्लक्ष झाले आहे. कंत्राटादारांच्या मनमानी कारभाराला आवरणार कोण, असा सवाल आहे.
कोरोनाच्या संकटात डासांचे आगार
बहुतेक भागांतील नाल्या पावसाळ्यापूर्वी स्वच्छ झाल्या नसल्याने तुंबलेल्या आहे. अनेक भागांत डबकी साचली आहेत. त्यामुळे डासांच्या अळ्यांची उत्पत्ती होत असल्याने आता कोरोना संकटात डेंग्यूच्या उदे्रकाची भीती निर्माण झालेली आहे. या डबक्यात ‘एमएलओ’ आॅईल टाकले जात नाही. महापालिका प्रशासन झोपेत असल्याने कंत्राटदार याकडे सोईस्कर दुर्लक्ष करीत आहेत. महापालिकेचे ज्येष्ठ आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक, अन्य कर्मचारी करतात तरी काय, असा अमरावतीकरांचा सवाल आहे.
फॉगिंग कुठे? फक्त फोटो सेशन
प्रत्येक कंत्राटदाराकडे पाच फॉगिंग मशीन असणे अनिवार्य आहे. मात्र, त्या फक्त कागदावरच ही स्थिती आहे. कुठल्याही भागात फॉगिंग केले जात नाही. अधिकारी, पदाधिकाऱ्यांच्या भेटीदरम्यान फक्त फोटो सेशन केले जाते. सर्वसामान्य नागरिकांच्या सेवेसाठी कधीच हा प्रकार होत नाही. कोरोनाकाळात तर सकाळ आणि सायंकाळ अशा दोन्ही वेळेला फॉगिंग करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले होते. यंत्रणेला याचा विसर पडला असून, एकाही नगरसेवकाने याबाबत विचारणा केलेली नाही, हे विशेष.