४० कोटींचे धरण फुटते रे... आदिवासींमध्ये दहशत; तहसीलदारांना निवेदन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2022 06:14 PM2022-12-29T18:14:20+5:302022-12-29T18:16:30+5:30
गावकरी म्हणतात, भ्रष्टाचार झाला रे...
नरेंद्र जावरे
चिखलदरा (अमरावती) : तालुक्यातील गांगरखेडा येथे दोन वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेल्या आमपाटी प्रकल्पाच्या मुख्य विमोचकामधून गढूळ पाणी येत असल्यामुळे परिसरातील आदिवासी पाड्यांमध्ये दहशत पसरली आहे. धरण फुटण्याची भीती त्यांनी तहसीलदारांना दिलेल्या एका निवेदनातून व्यक्त केली आहे.
चिखलदरा तालुक्यात गांगरखेडा येथे जलसंपदा विभागाच्या वतीने दोन वर्षांपूर्वी आमपाटी साठवण प्रकल्प ४० कोटी रुपये खर्चून तयार करण्यात आला. या प्रकल्पातून भविष्यात परिसरातील आदिवासी पाड्यांना पिण्याच्या पाण्यासह शेतजमिनीकरिता ओलिताची व्यवस्था होणार आहे. मात्र दोन वर्षांतच प्रकल्पाच्या जलवाहिनीतून गढूळ व मातीमिश्रित पाणी निघत असल्याने परिसरातील आदिवासींमध्ये दहशत पसरली आहे. तशा आशयाचे पत्र चिखलदरा येथील तहसीलदारांना धनराज आठोले, दुर्गेश गाठे, नरेंद्र गाठे, अतुल बिलवे, हेमंत नागले, मारुती आठोले, निंबा आठोले, मनीष नागले, संजय बेठेकर, सदानंद आठोले, गुलाब ब्राह्मणे, सुखदेव आठोले, स्नेहल नागले आदींनी दिले आहे.
पंधरा दिवसांपासून प्रयोगावर प्रयोग
प्रकल्पाच्या बाजूला असलेल्या मुख्य विमोचकामधून (एच आर) पंधरा दिवसांपासून गढूळ पाणी जात असताना जलसंपदा विभागामार्फत पानडुबीसह इतर प्रयोग करण्यात आल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली. परंतु, तेथील विहिरीत आग्यामोहळ असल्यामुळे येत्या एक-दोन दिवसात मुख्य विमोचकाचे गेट उघडून पुन्हा स्वच्छ पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे सांगण्यात आले.
निकृष्ट काम, कंत्राटदार-अधिकाऱ्यांची मर्जी?
जलसंपदा विभागाचे अधिकारी व संबंधित कंत्राटदाराच्या मर्जीप्रमाणे काळी माती न वापरता मोठ्या प्रमाणात दगड-धोंडे टाकण्यात आल्याची चर्चा गावकऱ्यांमध्ये होती. तसाच आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. धरणाच्या विहिरीच्या आउटलेटला मातीमिश्रित पाणी जात असल्याने गावकऱ्यांनी प्रकल्पाच्या गुणवत्तेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
प्रकल्पाच्या एचआरमधून मातीमिश्रित पाणी जात असल्याची माहिती आहे. त्याचे दार उघडून पूर्वीप्रमाणे स्वच्छ पाणी सोडण्यात येईल. धरण फुटण्याची अफवा आहे. तसे असल्यास ग्रामपंचायत व संबंधितांना त्याची माहिती देण्यात येईल.
- आकाश मानकर, कनिष्ठ अभियंता, जलसंपदा
प्रकल्पासंदर्भात गावकऱ्यांचे पत्र अप्राप्त आहे. संपूर्ण माहिती घेऊन तत्काळ संबंधित विभागाशी संपर्क साधून वरिष्ठांना तसे कळविण्यात येईल.
- माया माने, तहसीलदार, चिखलदरा