अमरावतीत महायुतीच्या उमेदवारांना ‘मोर्शी पॅटर्न’ची भीती; अर्ज माघारीकडे लक्ष
By गणेश वासनिक | Published: November 3, 2024 03:11 PM2024-11-03T15:11:28+5:302024-11-03T15:50:09+5:30
उमेदवारी अर्ज मागे घेण्यास केवळ एक दिवस हाती आहे.
गणेश वासनिक / अमरावती, मैदान कोण साेडणार याकडे लागल्या नजरा, बंडखोरांना नेत्यांचीच फूस असल्याच्या चर्चांना उधाण
अमरावती: २० नोव्हेंबर रोजी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत अमरावती जिल्ह्यातील आठ मतदार संघात महाविकास आघाडी
विरूद्ध महायुती उमेदवारांमध्ये लढतीचे चित्र आहे. मात्र मोर्शी मतदार संघात भाजप आणि अजित पवार गटाचे उमेदवार आमने-सामने
उभे ठाकले असून येथे मैत्रीपूर्ण लढत होणार आहे. त्यामुळे महायुतीत ‘मोर्शी पॅटर्न’अन्य मतदार संघात डोकेदुखी ठरणारा आहे. तिकीट न मिळाल्याने अनेकांनी बंडखोरी करत नामांकन दाखल केले आहे. नामांकन अर्ज मागे घेण्यास केवळ एक दिवस हाती आहे.
मोर्शी मतदार संघात महायुती धर्म पाळला नाही, असे म्हणत अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी विद्यमान आमदार देवेंद भुयार यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर भाजपने अगोदरच उमेश उर्फ चंदू यावलकर यांना उमेदवारी जाहीर करून माळी समाजाची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. खरे तर महायुती तिकीट वाटपाच्या फॉर्म्युल्यानुसार सिटींग आमदारांना उमेदवारी
देणे अनिवार्य होते. तथापि, भाजपने मोर्शीत महायुती धर्माचे पालन न केल्यामुळे अजित पवार गटाने ‘घड्याळ’वर आमदार भुयार यांना उभे केले आहे. त्यामुळे निकाल जो काही येईल, ते पुढे बघू या असे अजित पवार गटाने शड्डू ठोकला आहे. परंतु विधानसभा निवडणुकीत ‘मोर्शी पॅटर्न’हा अमरावती जिल्ह्यात ईतर बंडखोरांना सॉफ्ट काॅर्नर ठरत आहे. मोर्शीत मैत्रीपूर्ण लढत तर आमच्याही
मतदार संघात मैत्रीपूर्णच होऊ द्या ना? असे म्हणत अपक्ष बंडखाेरांनी उमेदवारी मागे न घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. त्यामुळे सोमवारी निवडणूक रिंगणातून काेण माघार घेतात, त्यानंतर त्या-त्या मतदार संघाचे चित्र स्पष्ट होणार आहे. बंडखाेर उमेदवारांची डोकेदुखी महायुती आणि महाविकास आघाडी असे दोन्हीकडे दिसून येत आहे.
‘अभी नहीं तो कभी नहीं’... ही तर नेत्यांची फूस नाही ना?
अमरावतीत माजी राज्यमंत्री जगदिश गुप्ता हे भाजपचे आहे. त्यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. मी भाजपचा बंडखोर उमेदवार असून रिंगणात कायम असेल, अशी गुप्ता यांची भूमिका आहे. बडनेरातून प्रीती बंड यांनी उमेदवारी दाखल केली आहे. मातोश्रीच्या सन्मानासाठी ही निवडणूक लढवित असल्याचे त्या ठामपणे सांगत आहे. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोदसिंह गड्रेल यांनी अचलपुरातून उमेदवारी दाखल केली असून पक्षाने अन्याय केल्याची त्यांची भावना आहे. भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष रविराज देशमुख यांनी तिवस्यातून नामांकन अर्ज दाखल केला असून त्यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती, हे विशेष. भाजपचे प्रभूदास भिलावेकर,
ज्योती सोळंके-मालवे, शिंदेसेनेच्या सविता आहाके यांनी नामांकन दाखल केले आहे. दर्यापूरातून काँग्रेसचे गुणवंत देवपारे, रामेश्वर अभ्यंकर, तर भाजपचे माजी आमदार रमेश बुंदिले यांनी युवा स्वाभिमान पार्टीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मोर्शीतून शरद पवार गटाचे डॉ. मनाेहर आंडे यांनीही नामांकन अर्ज दाखल केला आहे. एकंदरीत बंडखोरांची रिंगणातील उमेदवारी ‘अभी नहीं तो कभी नहीं’ याच धर्तीवर कायम असल्याचे दिसून येते. काही बंडखाेरांना पक्षातील नेत्यांचीच फूस असल्याची आता चर्चा होत आहे.