‘अम्ब्लोपिया’मुळे मुलांची दृष्टी जाण्याची भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 01:20 AM2019-05-27T01:20:09+5:302019-05-27T01:20:36+5:30
तिरळेपणा, जाड भिंगाचा चष्मा वापरणाऱ्या मुलांच्या डोळ्याची तपासणी ४ ते ८ वर्षांपर्यंत करणे गरजेचे आहे. अन्यथा अम्ब्लोपिया आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राज्यात ९१ हजार मुलांना दृष्टीदोष असल्याचे समोर आले आहे. याकडे पालकांनी दुर्लक्ष केल्यास अशा मुलांची दृष्टी कायमची जाण्याची भीती वैद्यकीय सूत्रांनी वर्तविली आहे.
इंदल चव्हाण।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : तिरळेपणा, जाड भिंगाचा चष्मा वापरणाऱ्या मुलांच्या डोळ्याची तपासणी ४ ते ८ वर्षांपर्यंत करणे गरजेचे आहे. अन्यथा अम्ब्लोपिया आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राज्यात ९१ हजार मुलांना दृष्टीदोष असल्याचे समोर आले आहे. याकडे पालकांनी दुर्लक्ष केल्यास अशा मुलांची दृष्टी कायमची जाण्याची भीती वैद्यकीय सूत्रांनी वर्तविली आहे.
अम्ब्लोपिया (लेझी आय) हा एक प्रादुर्भावामुळे आढळणारा डोळ्यांचा आजार आहे. ज्यामुळे जवळपास ५ ते १० टक्के लहान मुले ग्रस्त आहेत. आपल्या डोळ्यावर पडणारा प्रकाश डोळ्यातील दृष्टीपटलातून डोळ्यात शिरतो. त्याचे रुपांतर मज्जातंतू संदेशामध्ये होऊन तो डोळ्याच्या नसातून मेंदूपर्यंत जातो. मेंदू व डोळ्याच्या साह्याने आपणास दृष्टी येते. लेझी आय म्हणजे आपला एक किंवा दोन्ही डोळ्यांची दृष्टी काही कारणास्तव कमी होते व डोळा आळशी होतो. तपासणी केल्यावर जरी डोळा बाहेरून सामान्य वाटत असला तरी त्याची कार्यक्षमता कमी होते. परिणामी दुसºया डोळ्यावर ताण येतो. लहान मुले बरेचदा सांगण्यास असमर्थ असल्याने जोपर्यंत तिरळेपणा वा मोतीबिंदू स्पष्ट दिसणार नाही तोपर्यंत त्याचे निदान होेणार नाही.
अम्ब्लोपिया आजारात डोळा बाहेरून सामान्य वाटत असेल तर पालकांनाही ते ओळखणे शक्य होणार नाही. ज्या कुटुंबात डोळा तिरळेपणा, चष्म्याचे नंबर, मोतीबिंदू वा इतर आजार असेल त्यांनी आपल्या १ ते ४ वर्षांपर्यंच्या मुला-मुलींच्या डोळ्यांची तपासणी करून घेणे गरजेचे आहे. नेत्रतज्ज्ञ विविध प्रकारच्या चिकित्सा करून लेझी आय निदान करण्यास समर्थ असतात. या आजाराचे शक्य तेवढे लवकर निदान व उपचार केल्यास दृष्टी टिकवून ठेवणे सोयीचे होईल. वेळीच उपचार न केल्यास कायमस्वरुपी दृष्टी निकामी होऊ शकते व नंतर सुधारणा होऊ शकत नाही. त्यामुळे अॅम्ब्लॉपिया आजारावर उपचार करण्याची योग्य वेळ म्हणजेच जन्मापासून ४ वर्षांपर्यंत करावे. तसे १० वर्षांपर्यंत होऊ शकेल आहे. पण त्याचा किती लाभ होऊ शकेल, हे सांगणे कठीण असल्याची इर्विन रुग्णालयाच्या बाल नेत्रतज्ज्ञ प्रीती तायडे म्हणाल्या.
अम्ब्लोपिया आजाराची ओळख उशिरा होते. परंतु उपचार किमान ८ वर्षांपर्यंत करणे गरजेचे आहे. याकडे दुर्लक्ष केल्यास रुग्णाला आयुष्यभरासाठी दृष्टी गमावण्याची वेळ येते.
- नम्रता सोनोने,
जिल्हा नेत्र सर्जन,
इर्विन रुग्णालय, अमरावती
उपाययोजना
लेझी आयचे निदान उशिरा कळते. त्यावर उपचार दुष्कर होण्याची वाट न पाहता नेत्रतज्ज्ञांकडून तपासणी करून योग्य उपचाराद्वारे पाल्याला दृष्टीदोषापासून वाचवावे. मोबाईल, टी.व्ही.व्हिडीओ गेम खेळण्याची मुलांमधील क्रेज वाढत असून हे अम्ब्लोपिया आजारास कारणीभूत ठरू शकते.
लक्षणे
१ ते ४ वर्षांपर्यंत डोळ्यात तिरळेपणा, चष्म्याचा नंबर, एका डोळ्याची दृष्टी कमी होणे, डोळ्याची वृद्धी थांबणे आदी लक्षणे दिसल्यास त्वरित तपासणी करून घ्यावी.