पहिल्या टप्प्याच्या लसीकरणाला १४ फेब्रुवारी ‘डेडलाईन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 04:06 AM2021-01-24T04:06:56+5:302021-01-24T04:06:56+5:30

अमरावती : जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात १६,२६२ हेल्थ केअर वर्करचे लसीकरण करण्यात येणार आहे. मात्र, पाच दिवसांत फक्त १८१३ जणांचेच ...

February 14 deadline for first phase vaccination | पहिल्या टप्प्याच्या लसीकरणाला १४ फेब्रुवारी ‘डेडलाईन’

पहिल्या टप्प्याच्या लसीकरणाला १४ फेब्रुवारी ‘डेडलाईन’

Next

अमरावती : जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात १६,२६२ हेल्थ केअर वर्करचे लसीकरण करण्यात येणार आहे. मात्र, पाच दिवसांत फक्त १८१३ जणांचेच लसीकरण करण्यात आल्यामुळे या प्रक्रियेला किमान दोन महिने लागणार आहेत. आता शासनाने १४ फेब्रुवारी ही डेडलाईन दिल्याचे आरोग्य विभागाद्वारे सांगण्यात आले. त्यामुळे लसीकरणाचे दिवस अन् बूथची संख्या वाढविणे क्रमप्राप्त झाले आहे.

जिल्ह्यात १६ जानेवारीपासून चार केंद्रांवर कोविशिल्ड व एका केंद्रावर कोव्हॅक्सिनची लस देण्यात येत आहे. यासाठी याआधी नऊ केंद्रांची तयारी जिल्ह्याच्या आरोग्य विभागाद्वारे करण्यात आली. त्यानंतर एक व नंतर तीन अशी चार केंद्रे कमी करण्यात आली. सद्यस्थितीत अमरावतीला जिल्हा सामान्य रुग्णालय व पीडीएमसी तसेच जिल्हा ग्रामीणमध्ये अचलपूर उपजिल्हा रुग्णालय, तिवसा ग्रामीण रुग्णालय व अंजनगाव बारी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड-१९ प्रतिबंधासाठी लसीकरण करण्यात येत आहे.

आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांकडून दर गुरुवारी व्हीसीद्वारे आरोग्य यंत्रणेचा नियमित आढावा घेण्यात येतो. यामध्ये पहिल्या टप्प्यातील लसीकरण किमान १४ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्यात यावे, याविषयीच्या सूचना सर्व जिल्ह्यांना देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे आता रोजच्या लसीकरणात लाभार्थींची संख्यावाढ करण्यात येणार आहे. लसीकरणामध्ये खोळंबा आणणाऱ्या सॅाफ्टवेअरमध्ये आता सुधारणा करून तांत्रिक दोष निवारण करण्यात आल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.

बॉक्स

असे झाले लसीकरण

जिल्ह्याच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, १६ जानेवारीला ४४०, १९ जानेवारीला २५८, २० जानेवारीला ५५८ व २२ जानेवारीला ५५७ असे एकूण १८१३ आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. पहिल्या दिवशी २० जणांना हलका ताप आल्याच्या तक्रारी आल्यात त्यानंतर रिॲक्शन संदभार्त तक्रारी नसल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांनी सांगितले.

बॉक्स

तांत्रिक दोष निकाली

कोरोना लसीकरणाची प्रक्रिया ही ऑनलाईन आहे. यामध्ये सॅाफ्टवेअर व कोरोना ॲपमध्ये सुरुवातीला सातत्याने तांत्रिक दोष आले. आयटी विभागाद्वारे आता क्षमता वाढविण्यात येणार असल्याने संथ गतीची समस्या निकाली निघणार आहे. याशिवाय नावे ‘मिसमॅच’ व्हायचा प्रकारदेखील बंद झाल्याचे आरोग्य विभागाद्वारे सांगण्यात आले.

.

Web Title: February 14 deadline for first phase vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.