४० रुपयांत राबतात महिला परिचर
By Admin | Published: March 27, 2016 12:04 AM2016-03-27T00:04:07+5:302016-03-27T00:04:07+5:30
ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रावर प्रत्येक एक याप्रमाणे ४० रुपये रोजंदारीवर महिला परिचय सेवा देत आहेत...
नवी वेठबिगारी : आरोग्य विभाग कधी देणार लक्ष?
अमरावती : ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रावर प्रत्येक एक याप्रमाणे ४० रुपये रोजंदारीवर महिला परिचय सेवा देत आहेत ही महिलांची मिळवणूक असून एक प्रकारची वेठबिगारीच असल्याने या महिलांनी एवढ्या तुटपुंज्या मानधनावर उदरनिर्वाह कसा करावा, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आरोग्य विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
आरोग्य सुविधेसाठी ग्रामीण भागात प्राथमिक स्वास्थ्य केंद्र व उपकेंद्रे आरोग्य सुरू केले आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत अशी ५०० वर उपकेंद्रे आहेत. या केंद्रांवर एका महिला परिचराची नियुक्ती केलेली आहे. या महिला परिचरांना ४० रूपये मजुरी आहे. दरमहा बारासे रूपये पगार त्यांना देण्यात येतो.
प्राथमिक आरोग्य उपकेंद्रावर कार्यरत दोन आरोग्य रक्षकांना कामात मदत करणे व गावभर फिरून आरोग्याच्या योजना राबविण्यास मदत करणे, बाळंतीण महिलांना मदत करणे, गृहभेटी देऊन आवश्यक ती माहिती संकलित करून औषधोपचार संबंधित रुग्णापर्यंत पोहोचविण्याचे काम करणे यासह अन्य कामे या महिला परिचरांना करावे लागतात. राज्य शासनाच्या या बेपर्वा धोरणामुळे या महिला परिचर दारिद्र्यरेषेपेक्षाही कमी प्रवर्गात मोडत आहे. या कर्मचाऱ्यांना किमान १० हजार मानधन द्यावे अशी मागणी होत आहे.
आरोग्य विभाग
गंभीर नाही
ग्रामपंचायतीचा चतुर्थ श्रेणी कर्मचारी तसेच तलाठी कार्यालयातील कोतवालदेखील या महिला परिचरांपेक्षा अधिक मानधन घेतो. शेतात काम करणाऱ्या महिला कामगारदेखील सहा तासाचे १५० रुपयांपेक्षा अधिक मजुरी घेतात, अशा स्थितीत आरोग्य सुविधा पुरविणाऱ्या परिचारिकांना आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे केवळ ४० रूपये मजुरीवर काम करण्याची नामुस्की ओढवली आहे.