झेडपीमध्ये महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 11:42 PM2018-03-08T23:42:12+5:302018-03-08T23:42:12+5:30
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून गुरुवारी जिल्हा परिषद महिला व बाल कल्याण विभागाच्यावतीने शहरात काढण्यात आलेल्या दुचाकी रॅलीमुळे महिलाशक्ती एकत्र आली होती.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून गुरुवारी जिल्हा परिषद महिला व बाल कल्याण विभागाच्यावतीने शहरात काढण्यात आलेल्या दुचाकी रॅलीमुळे महिलाशक्ती एकत्र आली होती. या रॅलीने दुचाकीवर फेटे घातलेल्या महिलांनी शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले. यानिमित्त झेडपीच्यावतीने २८ आदर्श अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा आदर्श अंगणवाडी सेविका पुरस्कार देऊन सन्मान केला.
जागतिक महिला दिनानिमित्त महिला व बाल कल्याण विभागाने जिल्हा परिषद परिसरात आयोजित भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये आदर्श अंगणवाडी पुरस्कार, टीएचआर पाककृती स्पर्धा, पुष्प प्रदर्शन, निबंध स्पर्धा, आदिवासी नृत्य, स्वर गुंजन, रांगोळी स्पर्धा, रजिया सुलताना व क्षीप्रा मानकर यांचे व्याख्यान असे कार्यक्रम पार पडले. कार्यक्रमाचे उद्घाटक झेडपी अध्यक्ष नितीन गोंडाणे होते. अध्यक्षस्थानी महिला व बाल कल्याण सभापती वनिता पाल होत्या. प्रमुख अतिथी म्हणून उपाध्यक्ष दत्ता ढोमणे, सभापती जयंत देशमुख, सुशीला कुकडे, सदस्य वासंती मंगरोळे, पूजा हाडोळे, पूजा आमले, अनिता मेश्राम, आशा वानरे, भारती गेडाम, करुणा कोलटके, डेप्युटी सीईओ कै लास घोडके, श्रीमती घोडके आदी उपस्थित होते. यावेळी अध्यक्ष गोंडाणे यांची कन्या जिया हिच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मान्यवरांच्या हस्ते महिला दिनाचे औचित्य साधून केक कापून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी महिला व बाल विकास विभागाच्यावतीने जिल्ह्यातील २८ अंगणवाडी सेविका, १४ मदतनीस, बाल विकास प्रकल्प अधिकारी, परिचर, कनिष्ठ सहायक, स्वीय सहायक यातील प्रत्येकी एक, तर पाच पर्यवेक्षिकांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. याशिवाय ११० आयएसओ असलेल्या अंगणवाडींच्या सेविका व मदतनीस यांचाही प्रशस्तिपत्र, स्मृतिचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला व बाल कल्याण विभागाचे डेप्युटी सीईओ कै लास घोडके यांनी केले. संचालन प्राजक्ता राऊत यांनी केले. जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, अधिकारी तसेच महिला व बाल कल्याण विषय समितीचे सदस्य व अन्य मान्यवर उपस्थित होते.
आदर्श अंगणवाडी सेविका, मदतनीस पुरस्काराचे मानकरी
बिजेता अमेर, मीना मेमनकर, सुनीता बेठेकर, सुलोचना गोमकाळे, लता राज, नीलिमा घाटे, राजेश्वरी अंबुलकर, संध्या बोरकर, वंदना रूळकर, कोकिळा पाचबोले, रूपाली हिरूळकर, रजनी यादव, सुलोचना तायडे, ललिता मालवे, ललिता पखान, सरिता वाघमारे, द्रौपदा वावरे, यशोदा राठोड, सुनीता गोमकाडे, जयश्री शेलारे, रमा प्रभे, उषा रतए, द्वारका अडविकर, अनिता भिलावेकर, संध्या बुरांडे, देवकी मंगळे, देवका गजभिये, सरिता बोंदरे, नीलिमा जाधव, अर्चना ठाकरे, शीला गवई, राजकन्या कोसमकर, प्रणिता महल्ले, वनिता कोसे, कुमुद कडू, पुष्पा कळमकर, वैशाली फाटे, सुलभा डोळस, वंदना भंडागे, राजश्री सुरांजे, वनमाला गायन, सरला सदांशिव आदींचा यामध्ये समावेश आहे.
महिलांनी धरला ताल
जागतिक महिला दिनानिमित्त ‘स्वर गुंजन’ कार्यक्रमात जिल्हा परिषदेच्या परिसरात आयोजित कार्यक्रमात सहभागी झालेल्या अंगणवाडी सेविका, मदतनीस, पर्यवेक्षिका आणि महिला कर्मचाऱ्यांनी मराठी गाण्यावर ताल धरत आनंदही द्विगुणित केला.