घाट बंद; रेती येते कोठून?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 10:41 PM2018-12-21T22:41:38+5:302018-12-21T22:42:28+5:30
तालुक्यातील सर्वच रेतीघाट बंद आहेत. तरीही बांधकामावर रेती दररोज येत आहे, तर तहसीलदार पार्थ गिरी हे तीन महिन्यांपासून वैद्यकीय रजेवर आहेत. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीत रेतीमाफियांनी अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. रेतीमाफियांनी पटवारी यांनादेखील खुलेआम आव्हान दिले असून, हिंमत असेल, तर आमचे ट्रक, ट्रॅक्टर पकडून दाखवा, असे ठणकावले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनाच आता यावर लक्ष देण्याची मागणी तालुकावासीयांनी आली आहे.
सूरज दाहाट ।
लोकमत न्यूज नेटवर्क
तिवसा : तालुक्यातील सर्वच रेतीघाट बंद आहेत. तरीही बांधकामावर रेती दररोज येत आहे, तर तहसीलदार पार्थ गिरी हे तीन महिन्यांपासून वैद्यकीय रजेवर आहेत. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीत रेतीमाफियांनी अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. रेतीमाफियांनी पटवारी यांनादेखील खुलेआम आव्हान दिले असून, हिंमत असेल, तर आमचे ट्रक, ट्रॅक्टर पकडून दाखवा, असे ठणकावले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनाच आता यावर लक्ष देण्याची मागणी तालुकावासीयांनी आली आहे.
तिवसा तालुक्याच्या हद्दीतून वर्धा नदी गेली असून, तिवसा महसूल विभागात एकूण सात रेतीघाट आहेत. मात्र, हे सर्व रेतीघाट बंद आहेत. तथापि, नमस्कारी व तळेगाव ठाकूर येथील पिंगळाई नदीतून रेतीची रात्रसह दिवसाढवळ्या तस्करी होत आहे. तिवसा शहरात बांधकाम सुरू असून, या ठिकाणी वर्धेची काळी रेती व कन्हान रेती बांधकामावर येत आहे. शहरात कन्हान रेतीची ओव्हरलोड वाहतूक होत आहे. मात्र, अद्यापही या रेती तस्करांच्या मुसक्या आवळल्या गेल्या नाही. तिवसा शहरासह ग्रामीण भागात रेतीचे ढीग अवैध रीत्या पडून असून, यावर महसूल विभागाने कारवाई केली नाही. त्यामुळे महसूल विभागसुद्धा संशयाच्या भोवऱ्यात आहे.
वरूड तालुक्यात अवैध रेती वाहतुकीने रस्ते बेहाल
वरूड : मध्यप्रदेशातून येणारी रेती मोवाड, जलालखेडा, पुसला, सावंगी वाठोडा, उदापूर, राजूराबाजार अशी आणली जाते. यामुळे ग्रामीण रस्त्यांची वाट लागली आहे. रात्रीतून गौण खनिजाची वाहूतक करता येत नसताना, लाखो रुपयांच्या गौण खनिजाची चोरी होत आहे. अधिकाऱ्याच्या गल्लाभरू धोरणामुळे ेरेतीमाफियांचे चांगलेच फावले आहे, तर वरूड शहरातील रेती विक्रेत्याकडून ४० ते ५० टन वजनाचा ट्रक आणून, शहराबाहेर रेतीचे ढिगारे लावण्यात येऊन चिल्लर पद्धतीने टॅÑक्टरद्वारे रेतीची वाहतूक केली जाते. या रेती विक्रेत्याना प्रशासनाचे अभय असल्याने दिवसाढवळ्या रेती वाहतूक होत आहे. रेतीची वाहतूक रॉयल्टी घेऊनच करता येते. खदान ते नियोजित स्थळी रेती वाहतूक करण्याचा नियम असताना आणि रेतीचे ढिगारे लावून त्याची विल्हेवाट लावणे गुन्हा असताना अशाच प्रकारे सर्रास रेती विकली जात आहे. भरधाव वाहतुकीमुळे रस्त्यांची पार वाट लागली आहे. वाहनचालकांची त्यामुळे डोकेदुखी वाढली आहे.
असे आहेत नियम
नियम ५९ व ६० अन्वये देण्यात आलेल्या प्रत्येक खाण परवान्यात अट आहे की, कोणत्याही वेळी खड्ड्याची पृष्ठभागापासूनची खोली सहा मीटरपेक्षा अधिक नसावी. जे.सी.बी किंवा ब्लास्टिंग करुन गौणखनिज काढता येत नाही. परवाना क्षेत्रातून उत्खनन केलेले गौणखनिज काढून नेलेल्या गौण खनिजाचे प्रमाण, विक्री प्रमाणके, कामासाठी नेमलेल्या कामगारांची व दिलेल्या वेतनाची नोंदवही, स्वामित्वधन व इतर आकार यांचे अचूक लेखे ठेवणे बंधनकारक आहे. वनविभाग किंवा इतर हद्दीतील झाडे उत्खनना दरम्यान तोडता येत नाही, परवानाधारकाला कोणतेही सार्वजनिक रस्ते, इमारती, मंदिरे, नदी, नाले, जलाशय, दफनभूमी, रेल्वे मार्ग आदीपासून ५० मीटरचे आत खोदकाम करता येत नाही.
विनारॉयल्टी, ओव्हरलोड वाहतूक
मध्य प्रदेशातून किंवा तालुक्यातून रेतीची वाहतूक होत असताना रायल्टी भरल्याचा मॅसेज,गौण खनिज कोणते आहे तसेच किती ब्रास अशा तीन गोष्टी तपासण्यात येते. यामध्ये काही संशय आल्यास किंवा विनारॉयल्टी रेतीची चोरी होत असल्यास त्यांच्यावर नियमानुसार दंडात्मक कारवाई केली जाते. याकरिता प्रत्येक दिवसाला वेगवेगळे पथक पाठविण्यात येत असून याकरिता आवश्यकतेनुसार अधिकारी , कर्मचारी पाठवून पथके नेमली जातात.