सण चंद्रावर तर ऋतू सूर्यावर अवलंबून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 10:52 PM2018-05-15T22:52:41+5:302018-05-15T22:52:52+5:30
बुधवार १६ मे २०१८ पासून तर बुधवार १३ जून २०१८ पर्यंत अधिकमास आलेला आहे. यापूर्वी सन २०१५ मध्ये अधिक आषाढ महिना आला होता. आता या वर्षानंतर सन २०२० मध्ये अश्विन अधिक मास येणार आहे. अधिक मासालासच पुरूषोत्तम मास असेही म्हणतात.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : बुधवार १६ मे २०१८ पासून तर बुधवार १३ जून २०१८ पर्यंत अधिकमास आलेला आहे. यापूर्वी सन २०१५ मध्ये अधिक आषाढ महिना आला होता. आता या वर्षानंतर सन २०२० मध्ये अश्विन अधिक मास येणार आहे. अधिक मासालासच पुरूषोत्तम मास असेही म्हणतात. अधिकमास कमीत कमी २७ महिने व जास्तीत जास्त ३४ महिने असा या दोन अधिक मासामध्ये अंतर असते. तसेच अधिक मासामुळे सणांमध्ये १९ दिवसांचे अंतर यावर्षी येत असल्याची माहिती प्रख्यात ३००० वर्षांचे कॅलेंडर मुखपाठ करण्याचा विश्वविक्रम करणारे कॅलेंडरतज्ज्ञ सुभाष दाभिरकर यांनी दिली. यांच्या माहितीनुसार, सण हे चंद्रावर अवलंबून असतात आणि ऋतू हे सूर्यावर अवलंबून असतात.
भारतीय पंचांगामध्ये ठराविक ऋतुमध्ये येण्यासाठी चंद्र आणि सौर पद्धतीचा मेळ घालण्यात आलेला आहे. मीन राशीत सूर्य असताना ज्या चांद्र महिन्याचा प्रारंभ होईल, त्याला चैत्र म्हणावे. मेश राशीत सूर्य असताना ज्या चांद्र महिन्याचा प्रारंभ होईल त्याला वैशाख म्हणायचे. अशारितीने चांद्र महिन्यांना नावे दिली जातात. कधीकधी एका राशीत सूर्य असताना दोन चांद्र महिन्याचा प्रारंभ होतो. त्यावेळी पहिला तो अधिकमास समजला जातो आणि दुसरा तो निजमास समजला जातो.
३० तिथींचा एक चांद्रमास व ३६० तिथींचे एक चांद्र वर्ष होते. एका सौर वर्षाच्या काळात तशा तिथी सुमारे ३७१ होतात. प्रत्येक चांद्र वर्ष हे सौर वर्षापेक्षा ११ तिथीने लहान असते. दरवर्षीच्या ११ तिथी शिल्लक राहून त्यांची संख्या ३० झाले की अधिकमास येऊन चांद्र व सौर पद्धतीचा मेळ घातला जातो.
जेव्हा अधिकमास येतो, त्यावेळी चांद्रमासाचे ३९० तिथींचे एक चांद्रवर्ष होते. एकदा अधिकमास आल्यापासून मध्यममानान साडेबत्तीस चांद्र महिन्यांनी पुन्हा चांद्रमास येतो.
हिंदू धर्मात ज्येष्ठ अधिकमासात गंगादशहरा व्रत करावे, उपोषण नक्त भोजन, किंवा एकभुक्त व्रत करावे, देवापुढे अखंड दीप लावावा, तसेच जावयाला दान करण्याची प्रथा आहे.