सेवानिवृत्तांच्या आडून स्वेच्छानिवृत्तांसाठी ‘फिल्डिंग’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2018 09:59 PM2018-07-07T21:59:21+5:302018-07-07T21:59:39+5:30
विवक्षित कामासाठी सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना कंत्राटी सेवेत घेण्याच्या आडून स्वेच्छानिवृत्तांसाठी ‘फिल्डिंग’ लावण्यात आली आहे. १७ डिसेंबर २०१६ चा शासननिर्णयातील पळवाट शोधून ‘त्या’ स्वेच्छानिवृत्त अधिकाºयाची महापालिकेत ‘एन्ट्री’ करवून घ्यायची अन् त्यानंतर त्याला ‘शहर अभियंता’ पदावर बसवायचे, अशी खेळी रचण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : विवक्षित कामासाठी सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना कंत्राटी सेवेत घेण्याच्या आडून स्वेच्छानिवृत्तांसाठी ‘फिल्डिंग’ लावण्यात आली आहे. १७ डिसेंबर २०१६ चा शासननिर्णयातील पळवाट शोधून ‘त्या’ स्वेच्छानिवृत्त अधिकाºयाची महापालिकेत ‘एन्ट्री’ करवून घ्यायची अन् त्यानंतर त्याला ‘शहर अभियंता’ पदावर बसवायचे, अशी खेळी रचण्यात आली आहे.
तत्कालीन आयुक्त हेमंत पवार यांनी जीवन सदार यांना सेवानिवृत्त शासननिर्णयाचा आधार घेऊन राजापेठ ओव्हरब्रिज या विवक्षित कामाव्यतिरिक्त शहर अभियंता या नियमित पदाचा बेकायदा कार्यभार दिला. पवारांचा इतका वकूब होता की, त्या बेकायदेशीर नियुक्तीबाबत नगरविकास विभागाने ‘ब्र’ काढला नाही की कुण्या नगरसेवकाला (ंअपवाद जयश्री कुºहेकरांचा) सदार यांची नियुक्ती बेकायदेशीर वाटली नाही. सदारांचा तीन वर्षांचा कंत्राटी कार्यकाळ जूनमध्ये संपुष्टात आला व पवारांच्या बदलीने त्यांच्या पुनर्प्रवेशालाही खोडा बसला. त्यानंतर प्रतिनियुक्तीचा अधिकारी न आल्याने पालिकेने स्वेच्छानिवृत्त अधिकाºयांसाठी जाहिरात दिली. छत्रीतलाव, राजापेठ अशा विवक्षित कामासाठी सेवानिवृत्त अभियंत्याकडून अर्ज मागविले. त्या पार्श्वभूमीवर पालिकेतून स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या एका अभियंत्यासाठी जोरदार फिल्डिंग लावण्यात आली आहे. महापालिका सेवेत असताना अनेक नगरसेवक या अभियंत्यांचे लाभार्थी होते. त्यामुळेच या मर्जीतील स्वेच्छानिवृत्त अभियंत्याला जाहिरातीवाटे महापालिकेत आणायचे आणि हेमंत पवार आणि जीवन सदार या जोडगोळीचा संदर्भ घेत त्याला शहर अभियंता म्हणून अतिरिक्त कार्यभार द्यायचा, असा मनसुबा रचण्यात आला आहे. त्यासाठी एका नगरसेवकाने जोरदार पाठपुरावा सुरू केला आहे. तत्कालीन आयुक्तांनी भ्रष्टाचाराचे आरोप लावले होते त्याच्यासाठी ‘रेड कार्पेट’ अंथरण्याचा डाव महापालिकेत खेळला जात आहे. त्या पार्श्वभूमिवर सर्वांच्या नजरा नवनियुक्त आयुक्त संजय निपाणे यांच्याकडे लागला आहे. ते सेवानिवृत्तांची सेवा केवळ विवक्षित कामासाठी घेतला की पवारांप्रमाणे कंत्राटींकडे नियमित पदाचा कार्यभार सोपवितात, याकडे लक्ष लागले आहे.
‘त्यांची’ही धडपड
महापालिकेत ‘रिएन्ट्री’ घेण्यासाठी इच्छुक असलेल्या ‘त्या’ अभियंत्याने पदाधिकाºयांची पायधूळ माथी लावणे सुरू केले आहे. ते अभियंता चार दिवसांपासून महापालिकेत दृष्टीस पडत असून, सेवानिवृत्तांच्या आड किंवा अन्य मार्गाने परतण्याची धडपड त्यांनी चालविली आहे.