"ते" पाचवे बाळ सुदैवाने बचावले !

By Admin | Published: June 3, 2017 12:01 AM2017-06-03T00:01:30+5:302017-06-03T00:01:30+5:30

रविवारी मध्यरात्री पीडीएमसीतील शिशू बालक अतिदक्षता विभागात (एनआयसीयू) उपचार घेणाऱ्या चार शिशूंचा आकस्मिक मृत्यू झाला होता.

"That" the fifth child survived luckily! | "ते" पाचवे बाळ सुदैवाने बचावले !

"ते" पाचवे बाळ सुदैवाने बचावले !

googlenewsNext

पीडीएमसीतील अर्भक मृत्यू प्रकरण : "त्या" काळरात्रीचे वास्तव
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : रविवारी मध्यरात्री पीडीएमसीतील शिशू बालक अतिदक्षता विभागात (एनआयसीयू) उपचार घेणाऱ्या चार शिशूंचा आकस्मिक मृत्यू झाला होता. चारही शिशूंना ‘कॅल्शियम ग्लुकोनेट’च्या ऐवजी परिचारिका विद्या थोरात हिने पोटॅशियम क्लोराईडचे इंजेक्शन दिले; तथापि चार शिशूंना इंजेक्शन दिल्यानंतर पोटॅशियम क्लोराईड संपले. बॉटलमधील पोटॅशियम क्लोराईड संपल्यामुळे ते एनआयसीयूमधील अन्य एका बालकाला देण्यात आले नाही. म्हणूनच त्या पाचव्या बाळाचा जीव वाचल्याची माहिती हाती आली आहे.
पोटॅशियम क्लोराईडचे इंजेक्शन न दिल्याने ‘त्या’ पाचव्या बाळाचे प्राण वाचल्याच्या दाव्याला तपास अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे; तथापि त्या बाळाचे नाव जाहीर करण्यास पोलिसांनी असमर्थता दर्शविली. याप्रकरणी अटक केलेल्या डॉ.भूषण कट्टा आणि पारिचारिका विद्या थोरात यांच्या पोलीस कोठडीदरम्यान पीडीएमसीतील एनआयसीयूमध्ये रविवारी रात्री नेमके काय घडले, हे स्पष्ट झाले.
रविवारी रात्री पीडीएमसीच्या एनआयसीयूमध्ये एकूण ८ शिशू उपचारार्थ दाखल होते. त्यापैकी ३ शिशूंना त्यांच्या आर्इंकडे देण्यात आले. रविवारी रात्री १०.३० च्या सुमारास परिचारिका विद्या थोरात हिने प्रिस्किप्शननुसार त्या पाच शिशूंना इंजेक्शन देण्यासाठी आलमारीतून ‘कॅल्शियम ग्लुकोनेट’च्या ऐवजी पोटॅशियम क्लोराईडची बॉटल काढली व तिने सर्वप्रथम आफरीन बानोच्या नवजात मुलीला २.५ मिलीचे पोटॅशियम क्लोराईड इंजेक्ट केले. त्यानंतर माधुरी कावरे, शिल्पा वेरुळकर आणि पूजा घरडे यांच्या शिशूंना ते इंजेक्शन देण्यात आले. त्याचवेळी ते १० मिली औषध संपल्याचे थोरात यांच्या लक्षात आले. त्यामुळे उर्वरित एका शिशूला ते इंजेक्शन देण्यात आले नाही. सुदैवाने त्या बाळाचे प्राण वाचले. रविवारी रात्री पीडीएमसीतील एनआयसीयूत डॉ.भूषण कट्टा आणि डॉ.रुषिकेश घाटोळ यांच्यासह विद्या थोरात व अन्य एका महिला पारिचारिकेची ड्युटी होती. रात्री ११ च्या सुमारास डॉ.घाटोळ यांनी त्या शिशूंची तपासणी केलीे. तथापि तेव्हा त्या शिशूंना चुकीचे इंजेक्शन दिल्याचे त्यांच्या लक्षात आले नाही. रात्री १ च्या सुमरास घाटोळ यांना शिशूंच्या गंभीर परिस्थितीची जाणीव झाली. तोपर्यंत आफरीन बानोच्या बाळासह अन्य तीन बाळ दगावल्याचे त्यांच्या लक्षात आले. दरम्यान, शुक्रवारी आरोपी भूषण कट्टा आणि विद्या थोरात यांची सीपींसमोर पेशी घेण्यात आली.

असा उघड झाला प्रकार
आफरीन बानो यांच्या नवजात शिशूचा सेप्टिसेमियाने मृत्यू झाल्याचे पीडीएमसीकडून स्पष्ट करण्यात आले. शवविच्छेदन न करता ते मृत बाळ आफरीन बानो यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले. ते मृत बाळ पीडीएमसीमधून घेऊन जात असताना अन्य तीन बाळ दगावल्याची माहिती त्याचवेळी उजेडात आली व गहजब माजला.

Web Title: "That" the fifth child survived luckily!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.