उपोषणाचा पाचवा दिवस, आंदोलनाच्या समर्थनार्थ नागरिक रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:10 AM2021-07-22T04:10:13+5:302021-07-22T04:10:13+5:30
नेरपिंगळाई : गावाच्या मध्यभागातून जाणारा तिवसा ते रिद्धपूर मार्गाच्या रुंदीकरणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या उपोषणाचा मंगळवारी पाचवा दिवस होता. ...
नेरपिंगळाई : गावाच्या मध्यभागातून जाणारा तिवसा ते रिद्धपूर मार्गाच्या रुंदीकरणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या उपोषणाचा मंगळवारी पाचवा दिवस होता. आंदोलनाच्या समर्थनार्थ नागरिक रस्त्यावर उतरले. मात्र, अद्याप प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे.
मुख्य बाजार पेठेतून जाणाऱ्या रस्त्याच्या रुंदीकरणाच्या मागणीसाठी ग्रामपंचायत सदस्य रूपेश गणेश हे १६ जुलैपासून बेमुदत उपोषणावर आहेत. मंजूर झालेला रस्ता हा १६ मीटरचा व्हावा, अतिक्रमण काढल्यास दुकान व घरमालकास सरकारी नियमानुसार मोबदला द्यावा, रस्त्यामधून दुभाजक व स्ट्रीट लाईट बसवावे, या मागण्यांना भारतीय कम्युनिस्ट पक्ष, किसान सभा तसेच अनेक सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला आहे. २० जुलै रोजी नेरपिंगळाई येथे उपोषणाच्या समर्थनार्थ गावकऱ्यांनी रॅली काढली. यामध्ये रामदास भेले, विलास क्षीरसागर, गुलाम, सतीश इंगळे, पद्मजा फसाटे, रमा इंगळे, अंबादास राऊत, गौतम तायडे, तेजस पांडे, घोडू पहिलवान, श्रीकृष्ण घाटोळ, विजय मडावी, अंकुश देशकर, प्रमोद घाटे, सुनील तायवाडे व सर्व गावकरी मंडळी उपस्थित होती.
----------------
गावातील पुरुष, महिला, तरुण, विद्यार्थी आंदोलनाला सहभाग देत आहेत. शासनाने योग्य न्याय न दिल्यास उग्र आंदोलन करण्यात येईल.
- रूपेश गणेश, उपोषणकर्ता
------------
रस्ता रुंदीकरणासाठी गावात सुरु असलेल्या आंदोलनाला जनप्रतिनिधी तसेच अधिकाऱ्यांनी पाठ फिरवली आहे. सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यात प्रशासन अक्षम ठरले आहे.
- प्रकाश नवले, शाखा सचिव, भारतीय कम्युनिस्ट पक्ष