‘द काश्मीर फाइल्स’वरून परतवाड्यात दोन गटात राडा; १५ जण अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2022 03:58 PM2022-03-21T15:58:05+5:302022-03-21T18:35:50+5:30
पोलिसांनी दोन्ही गटातील १५ जणांना अटक केली असून, काहींचा शोध सुरू आहे.
परतवाडा (अमरावती) : अचलपूर शहरातील चित्रपटगृहातून ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट बघून आल्यावर परतवाडा शहरातील लाल पूल भागात ‘जय श्रीराम’चे नारे लागले. यानंतर दोन गटात नारेबाजी व हाणामारी झाल्याची घटना रविवारी रात्री १२:३० च्या सुमारास घडली. पोलिसांनी दोन्ही गटातील १५ जणांना अटक केली असून, काहींचा शोध सुरू आहे.
पोलीस सूत्रानुसार, रविवारी रात्री अचलपूर येथील चित्रपटगृहातून ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट बघून आल्यावर लाल पूलनजीक आझादनगर भागात काही युवकांनी ‘जय श्रीराम’ची नारेबाजी केली. त्यांच्या घोषणा ऐकून आझादनगर येथील काही मुस्लिम युवकसुद्धा बाहेर आले. त्यांनी एकमेकांना शिवीगाळ सुरू केली. या गदारोळात एका व्यक्तीला मारहाण करण्यात आली.
दरम्यान त्याठिकाणी उपस्थित पोलीस उपनिरीक्षक मनोज कदम, पोलीस जमादार राजेश पटेल व अश्लोक दहीकर, चालक सदांनद साबळे व विठ्ठल मुंडे, पोलीस अंमलदार मंगेश श्रीराव यांच्या पथकाने त्यांना पांगविले. विभागीय गस्तीवर ठाणेदार संतोष ताले व इतर कर्मचारी होते. पोलीस जमादार दीपक राऊत यांच्या फिर्यादीवरून तत्काळ दखल घेत सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा नोंदविला. जिल्ह्यात अगोदरच कलम ३७ (१) (३) मपोका लागू आहे, हे विशेष.
दोन्ही गटातील युवकांना केली अटक
पोलिसांनी दोन्ही गटातील १५ युवकांना अटक केली. त्यामध्ये प्रज्वल शंकर अंभोरे (१९), अमित शंकर अंभोरे (२०), गौरव गजानन शहारे (२०), अतिश रामचंद्र कोतरे (२२), लखन संतोष सोयाम (२९), लखन राजेंद्र इंगळे (२५), नीलेश देवचंद कोतरे (३२), नंदू दिलीप सरकटे (२६), अर्जुन शंकरराव निखाडे (३३), विक्की विष्णू अंभोरे (२४), शेख तन्वीर ऊर्फ तन्नू शेख अजिज (२६), मोहम्मद समीर मोहम्मद अयुब (२०), शेख शाकीर शेख रशीद (२३), गणेश श्याम उईके (१९) व आकाश किशोर इंगळे (३०, सर्व रा. आझादनगर, लाल पूल) यांचा समावेश आहे. १० ते १२ मुस्लिम युवक त्या परिसरातील मिश्र वस्तीतून पळून गेल्याचे पोलिसांनी सांगितले.