दुष्काळाशी लढा, चार हजार शेतकऱ्यांचे अर्ज
By admin | Published: February 11, 2017 12:09 AM2017-02-11T00:09:32+5:302017-02-11T00:09:32+5:30
दुष्काळावर मात करून शेती उत्पादनात शाश्वतता आणण्यासाठी ‘मागेल त्याला शेततळे’ योजना राबविण्यात येत आहे.
जिल्ह्यास सुधारित ४५०० चे लक्षांक : ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेत मार्चअखेरपर्यंत आॅनलाईन नोंदणी
अमरावती : दुष्काळावर मात करून शेती उत्पादनात शाश्वतता आणण्यासाठी ‘मागेल त्याला शेततळे’ योजना राबविण्यात येत आहे. जिल्ह्यास यंदा ३१५९ शेततळ्याचे लक्षांक होते. यामध्ये शासनाने डिसेंबर २०१६ सुधारित वाढ करुन ४५०० शेततळ्यांचे लक्षांक दिले. सदस्यास्थितीत ४२९६ शेतकऱ्यांनी योजनेला प्रतिसाद दिला. या मध्ये तालुकास्तरीय समितीने ३१०७ शेतकऱ्यांचे अर्ज तांत्रिकदृष्टया योग्य ठरविले आहे.
पर्जन्यावर आधारित कोरडवाहू शेतीसाठी पाणलोट व जलसंवर्धनाच्या माध्यमातून जलसिंचनाची उपलब्धता वाढविणे तसेच संरक्षित व शाश्वत सिंचनाची सुविधा निर्माण करण्यासाठी शेतकऱ्यांच्या वैयक्तिक लाभाची ‘मागेल त्याला शेततळे’ योजना जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. चालू वर्षासाठी या योजनेत अमरावती जिल्ह्यास ३ हजार १५९ शेततळ्याचे लक्षांक देण्यात आले होते. मात्र जिल्ह्यात सलग दुष्काळ व वाढत्या शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासनाने जिल्ह्यास २ हजार ३४१ शेततळ्याचे वाढीव असे एकूण ४ हजार ५०० शेतकऱ्यांचे लक्षांक दिले.
यामध्ये अमरावती तालुक्यात २००, भातकुली १०००, नांदगांव खंडेश्वर २५०, चांदूर रेलवे २००, धामणगांव रेल्वे १००, मोर्शी २५०, वरुड २५०, वरुड २००, तिवसा २००, चांदूर बाजार २००, अचलपुर २००, दर्यापुर १२००, अंजनगांव सुर्जी ४००, चिखलदरा २० व धारणी तालुक्यात ८० शेततळ्याचे लक्षांक देण्यात आले.
या योजनेंतर्गत कमीत कमी १५ बाय १५ बाय ३ मीटर व अधिकतम ३० बाय ३० बाय ३ मीटर आकाराचे शेततळे अनुज्ञेय आहे. सुधारित लक्षांकानुसार शासनाने शेतकऱ्यांद्वारा आॅनलाईन अर्ज मागविले. याला ४ हजार २४७ शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला. सर्वाधिक १२७० अर्ज दर्यापुर तालुक्यात प्राप्त झाले. अमरावती २४८, भातकुली ४०३, नांदगांव खंडेश्वर २४३,चांदूर रेलवे १६७, धामणगांव १३७, मोर्शी ४३२, वरुड २०४ तिवसा १५०, चांदूर बाजार २८५, अचलपूर २३२,अंजनगांव सुर्जी २७१, चिखलदरा ३६ व धारणी तालुक्यात ११८ आॅनलाईन अर्ज प्राप्त झाले. यामधय्े शासनाच्या निकषानुसार ३ हजार ८३० अर्ज पात्र ठरले.
मोर्शी तालुक्यातील २१०, तिवसा १७, चांदूर बाजार १६७ व अंजनगांव सुर्जी तालुक्यामधला एक असे ३९५ अर्ज अपात्र ठरले आहे. तांत्रिक दृष्ट्या ३ हजार ११४ अर्ज पात्र ठरले आहे. तर ६३२ अर्ज नामांजूर करण्यात आले. (प्रतिनिधी)
प्रति शेततळ्याला ५० हजारांचे अनुदान
प्रति शेततळ्याला ५० हजाराचे अनुदान देय आहे. गेल्या पाच वषर्डात एकदा तरी ५० पैश्यापेक्षा कमी पैसेवारी जाहीर गावातील शेतकऱ्यांना या योजनेचा प्राधान्यानी लाभ दिल्या जाणार आहे. यासाठी शेतकऱ्याकडे ०.६० हेक्टर जमीन असणे अनिवार्य आहे. शेतीचा सातबारा, ८-अ ही कागदपत्रे आवश्यक आहे. दारिद्रयरेषे खालील कार्डधारक व शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटूंबाच्या वारसाचा दाखला असणाऱ्यांना शेततळ्यासाठी प्राधान्य दिल्या जाणार आहे.
खारपाणपट्ट्यात उद्दिष्ट जास्त
जिल्ह्यात खारपनपट्टा असलेल्या दर्यापूर तालुक्यात १२०० व भातकुली तालुक्यात १००० असे एकूण २२०० शेतकऱ्यांचे उद्दिष्ट्य आहे. जिल्ह्यातील १४ तालुक्याच्या तुलनेत या दोन तालुक्यात ४५ टक्के लक्षांक दिला आहे. प्रत्यक्षात दर्यापूर तालुक्यात भरभरुन म्हणणेज १२७० तर भातकुली तालुक्यात केवळ ४०३ शेतकऱ्यांनी आॅनलाईन अर्ज करण्यात उत्साह दाखविला आहे.
२२७५ शेततळ्यांना कार्यारंभ, ३९२ कामे पूर्ण
तालुकास्तरीय समितीने ३१०७ अर्जांना मंजूरी दिली.या पैकी २२७५ शेततळ्यांना कार्यारंभ आदेश देण्यात आले आहे. यामध्ये अमरावती १०१, भातकुली २५०,नांदगांव खंडेश्वर १६३,चांदूर रेलवे ५९, धामणगाव ८८, मोर्शी २२२, वरुड ७९, चांदूर बाजार १०९, अचलपूर १६२,दर्यापूर ७१८, अंजनगाव सुर्जी १४५, चिखलदरा १६ व धारणी तालुक्यात १०५ शेततळ्यांचा समावेश आहे. या पैकी ३९२ शेततळ्यांची कामे सद्यास्थितीत पूर्ण करण्यात आली.
दीड कोटींचे अनुदान वितरित
यंदा १ कोटी ५९ लाख ६४ हजाराचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. अमरावती तालुक्यात ४.५७ लाख, भातकुली २५.०१, नांदगाव ०.८९, चांदूर रेल्वे ०.४९, धामणगाव ०.६७, मोर्शी ७.६८, वरुतड ४.३२, तिवसा २.००, चांदूर बाजार १४.२, अचलपूर ६.७७, दर्यापूर ८३.८३, अंजनगांव ४.६९, चिखलदरा १.२० व धारणी तालुक्यात ३.३२ लाखांचे अनुदान वितरित झाले.
शेततळ्यासाठी शेतकऱ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद आहे. सध्या शेतात रबीची पिके आहे. त्यानंतर आणखी मागणी वाढणार आहे. मार्च अखेरपावेतो आॅनलाईन अर्ज शेतकऱ्यांना करता येईल.
- दत्तात्रय मुळे,
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी