तीन दिवसानंतर संपला जीवनाचा लढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2019 01:33 AM2019-05-03T01:33:17+5:302019-05-03T01:33:57+5:30
वाचन करताना तोल जाऊन तिसऱ्या मजल्यावरून सर्व्हिस लाइनमध्ये कोसळलेल्या १५ वर्षीय मुलीचा जगण्यासाठी संघर्ष तिसऱ्या दिवशी संपला. गुरुवारी दुपारी ३ वाजता तिने अखेरचा श्वास घेतला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : वाचन करताना तोल जाऊन तिसऱ्या मजल्यावरून सर्व्हिस लाइनमध्ये कोसळलेल्या १५ वर्षीय मुलीचा जगण्यासाठी संघर्ष तिसऱ्या दिवशी संपला. गुरुवारी दुपारी ३ वाजता तिने अखेरचा श्वास घेतला.
इंद्रायणी विनोद खोकले (१५) असे मृत मुलीचे नाव आहे. ती श्री गणेशदास राठी विद्यालयात आठव्या वर्गात शिकत होती. कठोरा परिसरातील रंगोली लॉननजीक गुरुकृपा अपार्टमेंटमध्ये ती कुटुंबासह तिसºया माळ्यावर राहत होती. ३० एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता इंद्रायणी ही तिच्या फ्लॅटमध्ये शेवटच्या टोकावर ग्रिलच्या बाजूने वाचनाकरिता बसली होती. अचानक तिचा तोल गेला आणि ती तिसऱ्या मजल्यावरून थेट सर्व्हिस लाइनमध्ये काँक्रीट बांधकामावर कोसळली. यावेळी तिचे वडील लग्न सोहळ्याला गेले होते, तर आई शुभांगी घरकामात व्यस्त होती. अभियांत्रिकीला असलेली बहीण पयोष्णी कामानिमित्त बाहेर होती. तळमजल्यावरील कुटुंबांनी तिची किंकाळी ऐकली आणि सर्व्हिस लाइन गाठली. यानंतर तिला तातडीने रेडिएंट हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मृत्यूशी तिची झुंज गुरुवारी दुपारी ३ वाजता संपुष्टात आली. गाडगेनगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. गुरुवारी सायंकाळी जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यात आला.
हाडांचा चुराडा
तिसऱ्या मजल्यावरून अनवधानाने कोसळल्याने इंद्रायणीच्या छातीच्या बरगड्या, हातपायाची हाडे व मणक्याचीही हाडे तुटली होती.
सर्वत्र हळहळ
इंद्रायणीचे वडील विनोद खोकले हे शेतकरी आहेत. दोन वर्षांपूर्वी शिक्षणासाठी दोन्ही मुलींना त्यांनी अमरावतीला आणले. इंद्रायणी ही अभ्यासात हुशार होती. तिच्या मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.