माथाडी कामगारांच्या पेन्शनसाठी लढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 10:02 PM2018-11-12T22:02:59+5:302018-11-12T22:03:15+5:30
कृषिउत्पन्न बाजार समितीचा कणा असलेल्या हमाल, माथाडी कामगारांना पेन्शन योजना लागू करण्यासाठी शासनस्तरावर लढा उभारू, अशी ग्वाही आमदार रवि राणा यांनी कामगार मेळाव्यात दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कृषिउत्पन्न बाजार समितीचा कणा असलेल्या हमाल, माथाडी कामगारांना पेन्शन योजना लागू करण्यासाठी शासनस्तरावर लढा उभारू, अशी ग्वाही आमदार रवि राणा यांनी कामगार मेळाव्यात दिली.
येथील बाजार समितीत हमाल, माथाडी कामगार मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. शेतकरी आणि व्यापारी यांच्यातील दुवा असलेले हमाल, माथाडी कामगार दुर्लक्षित राहू नये, ही बाब आ. राणांनी स्पष्ट केली. हमाल, माथाडी कामगार कायम कष्टकरी आहे. त्यांचे श्रम, घामाचे मोल समजून या घटकासाठी पेन्शन योजना लागू करण्यासाठी आपण लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊ, असे त्यांनी जाहीर केले. तसेच म्हाडातील निवासी संकुलात १० टक्के आरक्षणाची मागणीदेखील शासनाकडे केली जाईल, असे ते म्हणाले. बडनेऱ्यात हमाल, माथाडी कामगारांसाठी चार कोटी रूपये खर्चून कामगार भवन साकारले जाणार आहे. मात्र, प्रशासनाने अद्यापही जागेसाठी ५० लाख रूपये भरण्याची अट लादल्याने अजूनही जागेचा प्रश्न कायम असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. हमाल, माथाडी कामगार ५० लाख रूपये कोठून भरणार असा सवाल आमदार राणांनी उपस्थित केला. तरी देखील आपण शासनस्तरावर सातत्याने प्रयत्नरत आहे. लवकरच ५० लाख रूपये जागेचे भरण्याबाबतची सूट मिळविणार असेही ते म्हणाले. मेळाव्याचे आयोजक बाजार समितीचे संचालक बंडू वानखडे यांच्या कार्याचे आमदार राणांनी कौतूक केले.
यावेळी बाजार समितीचे अध्यक्ष अशोक दहिकर, बाबा अढाव, बंडू वानखडे, विनोद गुहे, धुरड, लोंडे, विष्णू साबळे, अशोक सावळे, शिवाजी तावडे, मोहम्मद असद, विजू जाधव, विनायक तारापुरे, विठ्ठलरााव कंगाले, बाबू गजभे, अशोक खडसे आदींची उपस्थिती होती.