वरूड तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींमध्ये रणधुमाळी संपली, गृहभेटी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:11 AM2021-01-14T04:11:57+5:302021-01-14T04:11:57+5:30

वरूड : तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी संपली असून, गावनेते आणि उमेदवारांच्या गृहभेटी सुरू झाल्या आहेत. ग्रामपंचायत ...

Fighting ends in 41 gram panchayats of Warud taluka, home visit begins | वरूड तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींमध्ये रणधुमाळी संपली, गृहभेटी सुरू

वरूड तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींमध्ये रणधुमाळी संपली, गृहभेटी सुरू

Next

वरूड : तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी संपली असून, गावनेते आणि उमेदवारांच्या गृहभेटी सुरू झाल्या आहेत.

ग्रामपंचायत निवडणुकीचा बुधवारी सायंकाळी ५ वाजता प्रचार थांबला. १३९ प्रभागांतून ३७९ सदस्यांकरिता १५ जानेवारी मतदान होणार असून, बाहेरगावच्या मतदारांचा उमेदवारांनी शोध घेऊन त्यांना मतदानासाठी आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. रात्र वैऱ्याची समजून उमेदवार कामाला लागले आहेत. हॉटेल, ढाबे फुल्ल, तर शेतातही पार्ट्यांना उधाण आले आहे. पोलिसांच्या भीतीने आधीच दारूची साठवण करून मतदारांना प्रलोभन देण्याचा प्रकार सुरू झाला आहे .

तालुक्यातील महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी, शिवसेना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना आहे. काँग्रेसने वेगळी चूल मांडली, तर भाजपसुद्धा स्वतंत्र निवडणूक लढवित आहे. पक्षाचे बडे नेते मात्र घरातूनच राजकीय सूत्रे हलवित आहेत. युवा कार्यकर्ते जोमाने कामाला लागले. युवकाच्या झुंडीच्या झुंडी गावात फिरून उमेदवाराला निवडून आणण्याकजरिता जिवाचे रान करीत आहे. गावात पार्ट्यांनासुद्धा उधाण आले .

४१ ग्रामपंचायतींच्या १३९ प्रभागांकरिता ३७९ उमेदवार निवडून द्यायचे असून, यापैकी १४ बिनविरोध निवडून आले. यामध्ये सुरळी येथील प्रभाग १ ब आणि सावंगी येथील प्रभाग ४ अ या जागा उमेदवार नसल्याने रिक्त राहिल्या. देऊतवाडा येथे तीन, हातुर्णा, काटी, सातनूर येथे प्रत्येकी दोन, तर आमनेर, गणेशपूर, लिंगा, कुरळी, बहादा येथे प्रत्येकी एक असे १४ उमेदवार बिनविरोध निवडून आले. आता ९२४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

-------------

शेतातही रात्री पार्ट्या !

मटण, चिकनला अधिक प्राधान्य असून, अंडी माघारली , तर पोलिसांच्या भीतीने आठदिवसापासूनच दारूची साठवणूक केल्या गेल्याची चर्चा आहे . युवा मतदारांची दिवाळी असून, खाण्यापिण्याबाबत उमेदवारांनीसुद्धा हात मोकळा केला आहे . काहीही खा, पण मत आम्हालाच द्या, हा एकच नारा सुरू आहे.

--------------

मास्कशिवाय मतदान नाही

१५५ मतदान केंद्रे असून, निवडणूक निर्णय अधिकारी, ११ सहायक निर्णय अधिकारी, १५५ केंद्राधिकारी, ४६५ मतदान अधिकारी यांची नियुक्ती केली आहे. निवडणुकीपूर्वीच ५२७ लोकांच्या अँटिजेन टेस्ट करण्यात आल्या, तर ६५ लोकांच्या आरटी-पीसीआर टेस्ट केल्या. यामध्ये सहा जण कोरोना पॉझिटिव्ह आले. मतदान केंद्रावर मतदारांना विनामास्क प्रवेश दिला जाणार नसल्याचे निवडणूक विभागाने स्पष्ट केले.

Web Title: Fighting ends in 41 gram panchayats of Warud taluka, home visit begins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.