आदर्श मतमोजणी केंद्रात अखेरच्या फेरीपर्यंत आकड्यांचा घोळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 01:43 AM2019-05-24T01:43:32+5:302019-05-24T01:44:11+5:30
लोकशाहीच्या महोत्सवाचा गुरूवारी समारोप. त्यातही अमरावतीचे मतमोजणी केंद्राला भारत निवडणूक आयोगाने मुंबईसोबतच राज्यात आदर्श केंद्र म्हणून सन्मान दिला. अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी ही सन्मानाची बाब ठरली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : लोकशाहीच्या महोत्सवाचा गुरूवारी समारोप. त्यातही अमरावतीचे मतमोजणी केंद्राला भारत निवडणूक आयोगाने मुंबईसोबतच राज्यात आदर्श केंद्र म्हणून सन्मान दिला. अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी ही सन्मानाची बाब ठरली. मात्र, अखेरच्या दिवशी फेरीनहाय आकडेवारी जाहीर करताना जो काही घोळ शेवटच्या फेरीपर्यंत सुरू राहिला, त्यामुळे मतमोजणी केंद्रावरील प्रत्येकामध्ये संभ्रम निर्माण झाल्याची चर्चा या ठिकाणी सुरू होती.
पहिली फेरी आयोगाचे निर्देशाप्रमाणे सकाळी ८.३० ला सुरू झाली. त्यानंतर लगेच सुविधा पोर्टलवर अद्ययावत ट्रेंड यायला लागला. ईथवर सर्व ठीक चालले. मात्र, त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी पहिली फेरी जाहीर केली. त्यांच्या उद्घोषणेप्रमाणे मतदान केंद्रात, मीडिया कक्षात व मतदानकेंद्राबाहेर सर्वांनी उमेदवारनिहाय मते टिपूण घेतली. मात्र दहा मिनिटांत सहा मतदारसंघनिहाय प्रत्येक उमेदवारांना किती मते मिळाली याचा लेखाजोखा मीडिया कक्षाला देण्यात आला. त्यामध्ये प्रमुख उमेदवारांना मिळालेल्या मतांमध्ये काही मतांची तफावत दिसल्याने नक्की माहिती कोणती खरी याविषयी संभ्रमाची स्थिती निर्माण झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ध्वनीक्षेपकाद्वारे जाहीर करण्यात आलेली उमेदवारनिहाय मते खरी मानावित की माहिती कक्षाद्वारा दिलेला फेरीनिहाय रिपोर्ट खरा मानावा, याविषयीचा संभ्रम कायम राहिला. प्रत्येक माध्यम प्रतिनिधींच्या आकडेवारीतला घोळ शेवटपर्यंत कायम होता. बºयाचदा उमेदवारांचे प्रतिनिधीदेखील माध्यम कक्षात येऊन विचारणा करीत होते. अखेरची फेरी जाहीर झाली. उमेदवारांना प्रमाणपत्र वितरित झाल्यानंतर देण्यात आलेली अंतिम मतमोजणीच्या स्थितीनंतर या घोळावर पडदा पडला. पहिल्या चरणातील दुपारी १२ वाजल्यानंतर मीडिया कक्षातील सुविधा पोर्टलची सुविधा अर्धा ते पाऊण तासापर्यंत बंद होती. त्याचवेळी आयोगाच्या संकेतस्थळावर मात्र अमरावती लोकसभा मतदारसंघाचे अपडेट माहिती मिळत होती. त्यामुळे डिस्प्ले बंद ठेवण्याबाबतचा उद्देश काय होता, याची वाच्यता मात्र, निवडणूक विभागाने केली नाही. मीडियाचे नोडल अधिकारी यांनी 'नेट स्लो' असल्याचे थातूतमातूर कारण देऊन वेळ मारून नेली. संबंधित विधानसभा मतदारसंघातील मोजणी आटोपल्यानंतर निरीक्षकांच्या परवानगीने या मशीनमधील मतांची मोजणी करण्यात आली.
१९ सीयूची मोजणी थांबविली
अमरावती अचलपूर व तिवसा विधानसभा मतदारसंघातील १९ ईव्हीएमचे मतदान प्रक्रिया झाल्यानंतरचे बटन बंद करावे लागते. मात्र, या सर्व मशीनचे बटन बंद न केल्यामुळे मतमोजणीच्या वेळी या सर्व मशीन सुरूच असल्याचे निदर्शनात आले. त्यामुळे या मशीनच्या सीयूची मोजणी थांबविण्यात आली. यामध्ये अमरावती विधानसभेतील सात, तिवसा विधानसभेतील मतदान केंद्र १४, १०८, ११८ व १२५ अचलपुरातील मतदान केंद्र ८१, १०७, २८१ व १२९ आदी ठिकाणची मोजणी आयोगाचे मुख्य निरीक्षक दिनेशकुमार यांच्या परवानगीने त्या तेथील मोजणी आटोपल्यानंतर या सीयू (कंट्रोल युनीट) चे क्लोज बटन हे बंद करण्यात येऊन पुन्हा मोजणी करण्यात आली.