रेमडेसिविर प्रकरणात आरोपी ताब्यात घेण्याकरिता न्यायालयात अर्ज दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:12 AM2021-05-22T04:12:59+5:302021-05-22T04:12:59+5:30
अमरावती : रेमडेसिवीर इंजेक्शनच्या काळाबाजार प्रकरणातील आरोपींना ताब्यात घेण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेने (ईओडब्ल्यू) शुक्रवारी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. ...
अमरावती : रेमडेसिवीर इंजेक्शनच्या काळाबाजार प्रकरणातील आरोपींना ताब्यात घेण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेने (ईओडब्ल्यू) शुक्रवारी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. शनिवारी या अर्जावर न्यायालय काय आदेश देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पोलिसांनी सर्व आरोपी पुन्हा ताब्यात घेतल्यानंतरच या प्रकरणाच्या तपासाला गती मिळणार आहे. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आल्यानंतर पोलिसांनी सर्वप्रथम सहा आरोपींचा जामीन रद्द करण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला. त्यानुसार न्यायालयाने सर्व आरोपींचा जामीन रद्द केला होता. त्यानंतर आता सर्व आरोपी ताब्यात घेण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेने न्यायालयात अर्ज दाखल केल्याची माहिती तपास अधिकारी शिवाजी बचाटे यांनी दिली. आरोपी पुन्हा ताब्यात आल्यानंतरच या प्रकरणाच्या पुढील तपासाला गती मिळणार आहे.
बॉक्स
धाड टाकणारा तपास अधिकारीही पॉझिटिव्ह
रेमडेसिविर इंजेक्शनच्या काळाबाजार प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक केल्यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यावेळी लॅब टेक्नीशयन असलेला एक आरोपी पॉझिटिव्ह निघाला होता. त्यानंतर आरोपीच्या संपर्कात आलेल्या पोलिसांचीही कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यामध्ये एक पोलीस अधिकारीही पॉझिटिव्ह आला. दरम्यानच आरोपींना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती. एवढ्या गंभीर प्रकरणात आरोपींना पीसीआर न मिळता न्यायालयीन कोठडी मिळाल्याने हा विषय राज्यभर चांगलाच गाजला होता.
बॉक्स
असे आहे प्रकरण
रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करून गरजू रुग्णांना त्याची चढ्या दराने विक्री करणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखेने मंगळवार, ११ मे रोजी भंडाफोड केला. या प्रकरणात पोलिसांनी अनेक ठिकाणी छापामार कारवाई करून डॉ. पवन दत्तात्रय मालुसरे (३५ रा. कॅम्प रोड, फ्रेजरपुरा), डॉ. अक्षय मधुकर राठोड (२४, रा. क्वॉर्टर क्रमांक ४, ग्रामीण रुग्णालय, भातकुली), पूनम भीमराव सोनोने (२६, रा. पीडीएमसी होस्टेल), अनिल गजानन पिंजरकर (३८, रा. सर्वोदय कॉलनी), शुभम प्रमोद सोनटक्के (२४, रा. चपराशीपुरा), शुभम शंकर किल्लेकर (२४, रा. वडाळी) व विनीत अनिल फुटाणे (२१, रा. खराळा) यांना अटक केली होती. या प्रकरणाची पुन्हा कसून चौकशी होणार आहे. त्यामुळे या प्रकरणात बडे मासे हाती लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.