सिंचन विभागातील फाईल वर्षभरापासून प्रलंबित
By admin | Published: November 19, 2015 12:50 AM2015-11-19T00:50:53+5:302015-11-19T00:50:53+5:30
जिल्हा परिषद सिंचन विभागाने जलयुक्त शिवार योजनेतून चिखलदरा, धारणी, आणी चांदुर बाजार या तीन तालुक्यातील कोल्हापुरी,
कामांना ब्रेक : जिल्हा परिषदेतील प्रकार, साठवण, कोल्हापुरी बंंधारे
अमरावती : जिल्हा परिषद सिंचन विभागाने जलयुक्त शिवार योजनेतून चिखलदरा, धारणी, आणी चांदुर बाजार या तीन तालुक्यातील कोल्हापुरी, साठवण बंधाऱ्यांची कामे मागील जानेवारी महिन्यात निविदा काढून मंजूर केली आहेत. मात्र, वर्ष संपत असतांना कोट्यवधी रूपयांची ही कामे केवळ पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीअभावी पेंडिंग असल्याचा धक्कादायक प्रकार जिल्हा परिषद लघु सिंचन विभागात उघडकीस आला आहे.
जलयुक्त शिवार ही योजना राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आहे. सदर कार्यक्रमाच्या माध्यमातून जलसंधारण तसेच पाणी टंचाई निवारण्याचा संकल्प केला आहे. यामधून जिल्हा परिषद लघु सिंचन विभागाने कोट्यवधी रूपयांच्या कोल्हापुरी बंधाऱ्यांच्या कामाच्या निविदा मागील जानेवारी ते एप्रिल महिन्यातच काढल्या. या निविदांना जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन व आणि स्थायी समितीची मंजूरी घेणे आवश्यक आहे. दोन्ही समितीची मान्यता झाल्यानंतर ज्या निविदा प्रक्रियेला मान्यता देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य शिलेदारांची स्वाक्षरी आवश्यक आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या लघु सिंचन विभागाने माहे फेब्रुवारी ते एप्रिल महिन्यात मंजुर करण्यात आलेल्या निविदा प्रक्रीयेच्या फाईल संबंधित पदाधिकाऱ्यांकडे पाठविल्या आहेत. यामध्ये जलयुक्त शिवार योजनेतील चिखलदरा तालुक्यातील पाटकोह, कालापांढरी, धारणीतील सुसर्दा, कवडाझिरी, चिचघाट, आणी चांदुर बाजार तालुक्यातील शिरजगाव अशा सहा गावात कोल्हापुरी व साठवण बंधाऱ्यांची कोट्यवधी रूपयांची कामे मंजूर करुन तब्बल ११ महिन्यांचा कालावधी लोटून गेला. या मंजूर कामांच्या फाईल केवळ स्वाक्षरीसाठी अडकल्या असल्याने जलयुक्त शिवार योजनेच्या वरील कामाचा कार्यारंभ आदेश देता आला नाही. परिणामी ही कामे अद्यापही सुरू झाली नसून उलट स्वाक्षरी अभावी पेन्डींग पडून आहेत. दरम्यान, याबाबत तत्कालीन जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अनिल भंडारी यांनी सदर कामे त्वरित सुरू करण्यासाठी पदाधिकाऱ्यांना लेखी पत्र देऊन या फाईल निकाली काढण्याची विनंती केली होती. यावर अद्यापही शिल्लेदारांनी स्वाक्षरी केली नसल्याने आता याविरोधात आक्रमक भूमिका घेण्याचा तयारी शिवसेनेचे जिल्हा परिषद गट नेता सुधीर सूर्यवंशी यांनी घेतली आहे. याबाबत सीईओना पत्र देऊन त्वरित निर्णय मागणी केली आहे. त्यामुळे यावर मुख्यकार्यकारी अधिकारी सुनिल पाटील हे काय निर्णय घेतात याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.