सहायक सचिव, शिपायासह तिघांविरूद्ध गुन्हे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:13 AM2020-12-22T04:13:38+5:302020-12-22T04:13:38+5:30
परतवाडा : अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गतवर्षी झालेल्या कर्मचारी भरतीत गैरप्रकार केल्याच्या प्रकरणात परतवाडा पोलिसांनी सोमवारी सहायक सचिव ...
परतवाडा : अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गतवर्षी झालेल्या कर्मचारी भरतीत गैरप्रकार केल्याच्या प्रकरणात परतवाडा पोलिसांनी सोमवारी सहायक सचिव मंगेश भेटाळू व सहकारी शिपायासह तिघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले. यामुळे सहकार क्षेत्रात एकच खळबळ उडाली.
बाजार समितीचे सहायक सचिव मंगेश सुभाषराव भेटाळू (रा. देवमाळी परतवाडा), शिपाई शैलेश शुक्ला (रा. केदारनगर क्रमांक-२ देवमाळी, परतवाडा) व लता राकेश वाजपेयी (रा. पथ्रोट) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. परतवाडा पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम ४२०, ४६५, ४६८, ४७१, ३४ अन्वये गुन्हे दाखल केले. बाजार समितीचे सचिव पवन सार्वे यांनी या प्रकरणी १७ डिसेंबर रोजी परतवाडा पोलिसांत फिर्याद दाखल केली होती. चौकशीदरम्यान या प्रकरणातील मूळ कागदपत्रे दाखल करण्याचे निर्देश पोलिसांनी बाजार समिती प्रशासनाला दिले होते. त्यावरून सोमवारी संबंधित कागदपत्रे हाती येताच गुन्हे दाखल करण्यात आले. येत्या सहा महिन्यांत अचलपूर बाजार समितीची निवडणूक होऊ घातली आहे. असे असताना कर्मचारी भरतीत झालेला घोळ व गुन्हे दाखल झाल्याने बाजार समिती चर्चेत आली आहे.
असे आहे प्रकरण
अचलपूर बाजार समितीत सन २०१९ मध्ये सरळ सेवा भरतीद्वारे विविध पदे ऑनलाईन परीक्षेच्या माध्यमातून भरावयाची होती. त्याकरिता विविध संस्थांकडून निविदा मागविण्यात आल्या. दरम्यान भरती प्रक्रियेत सहायक सचिव मंगेश भेटाळू व शिपाई शैलेश शुक्ला यांनी गैरप्रकार केल्याचे अचलपुर पोलिसांनी केलेल्या तपासात उघड झाले. तो अहवाल जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव यांनी बाजार समितीला पाठवून यासंदर्भात पोलिसांत तक्रार नोंदविण्याचे आदेश दिले होते.
‘लोकमत''ने केले होते भाकित
अचलपुर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नोकर भरतीत झालेल्या गैरप्रकाराबाबत ‘लोकमत''ने संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल होणार असल्याचे वृत्त रविवारी प्रसिध्द केले होते. त्यानंतर तातडीने सोमवारी दुपारी गुन्हे दाखल करण्यात आले.
कोट
अचलपूर बाजार समिती प्रकरणात संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. पुढील चौकशी सुरू आहे.
- प्रदीप चौगावकर, ठाणेदार
परतवाडा
-------