वरूड येथील ऑक्सिजन प्लांटसाठी सुटे भाग दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:10 AM2021-06-26T04:10:15+5:302021-06-26T04:10:15+5:30
प्रशांत काळबेंडे जरूड : वरूड तालुक्यातील बेनोडा येेथे उभारण्यात येत असलेल्या ऑक्सिजन प्लांटसाठी सुटे भाग २५ जून रोजी दाखल ...
प्रशांत काळबेंडे
जरूड : वरूड तालुक्यातील बेनोडा येेथे उभारण्यात येत असलेल्या ऑक्सिजन प्लांटसाठी सुटे भाग २५ जून रोजी दाखल झाले. ‘ऑक्सिजन प्लांटचे भिजतघोंगडे कायम’ या मथळ्याखाली २२ जून रोजी ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित झाल्यानंतर ही कार्यवाही करण्यात आली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील २६० तालुक्यात ऑक्सिजन प्लांट उभारण्याची घोषणा केली होती. यात अमरावती जिल्ह्यातील वरूड आणि दर्यापूरचा समावेश होता. त्यानुसार आ. देवेंद्र भुयार यांनी जिल्हाधकाऱ्यांना ५८ लक्ष ६८ हजार रुपयाची आमदार निधीची तरतूद केली. वरूड तालुक्यातील बेनोडा येथील रुग्णालयात दररोज ४४ सिलेंडर भरता येईल असा हवेतून ऑक्सिजन निर्मिती प्लांट उभारण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या सहीनिशी नागपूर येथील कंपनीला काम करण्याचे आदेशपत्र दिले गेले होते. मात्र, त्याचे काम सुरूच झाले नाही. त्यामुळे हा प्लांट नेमका आहे कुठे, असा प्रश्न विचारला जात आहे. ‘लोकमत’च्या वृत्ताने आरोग्य यंत्रणेसह जिल्हाधिकारी कार्यालय जागे झाले. त्यातच प्रशासनाला ऑक्सिजन प्लांटला लागणारी सर्व सामग्री पाठवणे भाग पाडून लवकरात लवकर काम सुरू करण्याच्या दृष्टीने आ. देवेंद्र भुयार यांनी निर्देश दिले आहेत.