प्राथमिक उपशिक्षणाधिकारी पंडागळेविरुद्ध गुन्हा दाखल
By admin | Published: November 13, 2015 12:32 AM2015-11-13T00:32:47+5:302015-11-13T00:32:47+5:30
सेमाडोह येथील प्राथमिक शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक विजय नकाशे यांच्या आत्महत्येप्रकरणी चिखलदरा पोलिसांनी जिल्हा परिषदेचे प्राथमिक विभाग ...
अमरावती : सेमाडोह येथील प्राथमिक शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक विजय नकाशे यांच्या आत्महत्येप्रकरणी चिखलदरा पोलिसांनी जिल्हा परिषदेचे प्राथमिक विभाग उपशिक्षणाधिकारी पंडित पंडागळे यांच्याविरुद्ध मंगळवारी भादंविच्या ३०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पीआरसीच्या धसक्याने नकाशे यांनी आत्महत्या केल्याची ओरड होत असून उपशिक्षणाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा नोंदविल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
दादाराव उकंडराव वानखडे (५८, साईनगर, बडनेरा रोड, अमरावती) यांनी याबाबत चिखलदरा पोलिसांमध्ये तक्रार नोंदविली. यापूर्वी या प्रकरणात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. तपासादरम्यान नकाशे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे उघड झाल्यानंतर जबानी बयानावरून पंडागळेंविरूद्ध भादंविच्या कलम ३०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती चिखलदरा पोलिसांनी दिली. ७ नोव्हेंबरला पहाटे विजय नकाशे यांचा मृतदेह जिल्हा परिषद शाळेतच गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला होता. पंचायतराज समितीच्या एका पथकाने या शाळेला भेट दिली होती. त्या पार्श्वभूमिवर पंचायतराज समितीच्या धसक्याने नकाशे यांनी आत्महत्या केली, असा आरोप विविध शिक्षक संघटनांनी केला आहे.
प्रत्यक्षात आरोपाच्या अनुषंगाने पंचायतराज समितीच्या कुठल्याही पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला नाही. याउलट मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याबाबत पंडागळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीआरसीच्या भेटीत येथील शाळेत २५ किलो तांदूळ कमी आढळल्याने त्यांनी नकाशे यांना अपमानित केले. त्यामुळेच त्यांनी कारवाईचा धसका घेऊन आत्महत्या केल्याचा आरोप अनेक शिक्षक संघटनांसह मृतांची पत्नी नीता, भाऊ राजेंद्र नकाशे यांनी केला. नकाशे यांना पंडागळे यांनी मानसिक त्रास दिल्यावरून हा गुन्हा नोंदविला आहे.