चिखलदऱ्यात हिंदी चित्रपटाचे चित्रीकरण
By admin | Published: March 29, 2015 12:36 AM2015-03-29T00:36:24+5:302015-03-29T00:36:24+5:30
विदर्भाचे नंदनवन म्हणविणाऱ्या चिखलदरा पर्यटन स्थळावर आता मराठीसह हिन्दी चित्रपटांचे चित्रिकरण होऊ लागले आहे.
नरेंद्र जावरे चिखलदरा
विदर्भाचे नंदनवन म्हणविणाऱ्या चिखलदरा पर्यटन स्थळावर आता मराठीसह हिन्दी चित्रपटांचे चित्रिकरण होऊ लागले आहे. येथील स्थानिक निर्मात्याने मुंबईतील बड्या कलाकारांना घेऊन ‘आतंक’ या हिन्दी चित्रपटाचे चित्रीकरण येथे सुरु केले आहे. यामुळे या उपेक्षित पर्यटन स्थळावर पर्यटकांची गर्दी वाढली आहे.
अमरावतीच्या ‘स्वानंद फिल्म प्रॉडक्शन’ निर्मित हिन्दी चित्रपट ‘आतंक’चे चित्रीकरण चिखलदऱ्याच्या निसर्गरम्य वातावरणात गेल्या मागील १५ दिवसांपासून सुरु आहे. मेळघाटच्या आदिवासी संस्कृतीसह सागवान तस्करी आणि मुंबईवरून मेळघाटात डॉक्युमेंट्री तयार करायला आलेली मुलगी येथील गाईडच्या प्रेमात पडते या प्रेमकथेसह मेळघाटातील बुवाबाजी, वनकर्मचारी अधिकारी पोलिसांना येथे करावा लागणारा सामना या कथेवर चित्रीकरण सुरु आहे.
चित्रपटाचा मुहूर्त गुरुदेव विद्या प्रसारक मंडळाचे सरचिटणीस ज्ञा.पू. ऊर्फ दादासाहेब राऊत यांचे हस्ते करण्यात आला. यावेळी मोथा येथील उपसरपंच साधुराम येवले, निर्माता नितीन राऊत, स्वानंद डोंगरे, आरती राऊत, सहनिर्माता मंगलसिंग धुर्वे, कार्यकारी निर्माता डॉ. रमेश खाकरे, दिलीप मालवीय, दिग्दर्शक इश्वर भारतीय कलाकार इब्बू शहा, सह मान्यवर उपस्थित होते.
चिखलदऱ्यात हिंदी चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये औत्सुक्याचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच चिखलदऱ्याची उपेक्षाही यामुळे कमी झाली असून आता या पर्यटननगरीला चांगले दिवस येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
स्थानिक निर्मात्याचे धारिष्ट्य
विदर्भाचे एकमेव पर्यटन स्थळ असलेल्या चिखलदरा पर्यटन स्थळाचा विकास आजही पाहिजे त्या प्रमाणात झाला नाही. परिणामी कधीकाळी लाखांवर असलेली पर्यटकांची गर्दी ओसरु लागली आहे. स्थानिका व्यवस्था पर्यटकावर अवलंबून असल्याने येथील व्यावसायिकांवर आर्थिक संकट ओढवले आहे. शासनाने चिखलदऱ्याची सातत्याने उपेक्षाच केली आहे. अशातच येथील नितीन राऊत या हॉटेल व्यावसायिकाकडे मेळघाटातील मंगलसिंग धुर्वे, रमेश खाकरे, दिलीप मालवीय यांना घेऊन हिन्दी चित्रपट ‘आतंक ’ ची निर्मिती करायला सुरुवात केली. गाव वाचविण्यासह येथील निसर्ग सौंदर्य खुलावे व त्याची प्रचिती दूरपर्यंत जावी, मुंबई पुण्याचे निर्माते चित्रीकरणासाठी यावेत. या उद्देशाने त्यांनी स्वत:च या क्षेत्रातील कवडीचा अनुभव नसताना पाऊल टाकण्याचे धाडस केले आहे आणि याचा त्यांना अभिमानही आहे.
मुंबई, विदर्भ आणि स्थानिक कलावंतांचा समावेश
‘आतंक’ चित्रपटात शक्ती कपूर, तिरंगा चित्रपटात गेंडास्वामी साकारणारे दीपक शिर्के, रवींद्र बेर्डे या अभिनेत्यांसह मोहन काळे, अभिलाषा पाटील, रमेश चांदणे, जयश्री गायकवाड, अजिंक्य निकम, पूजा तायडे, नितीन नरेश, इब्बू शहा, इरावती लागू, अनुराधा भावसार, शिल्पा मेंढेकर, गीता कठोरकर, सचिन कटांगळे, आशिष शिंगोरे, रोहन शिंगोटे, मोहन पाटील, डोंबरे, क्षीरसागर, मारोती शिरसाट, साहिल शहा यांच्यासह मुंबई व विदर्भातील तसेच स्थानिक कलावंतांचा समावेश आहे.
मुंबईत सांगू चिखलदऱ्याचे सौंदर्य : शक्ती कपूर
‘आतंक या हिन्दी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी नुकताच शक्ती कपूर येऊन गेला. त्याला चिखलदऱ्याच्या निसर्ग सौंदर्याने भुरळ घातली. देश-विदेशात चित्रपटाचे चित्रीकरणासाठी मोठे निर्माते जातात. त्यांना या पर्यटन स्थळाबद्दल आपण माहिती देणार असल्याचे शक्ती कपूरने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. ७०० पेक्षा जास्त व जवळपास सर्वच भाषांच्या चित्रपटात काम केलेल्या शक्ती कपूरला आंतरराष्ट्रीय स्तरावरील चित्रपटात काम करायचे असून सन्मानाने निमंत्रण आल्यास जाणार असल्याचे सांगितले. पडद्यावरचा खलनायक आपल्या मुलांच्या यशात मोठा वाटा पत्नीचा व आपणही आपले कर्तव्य पार पाडीत असल्याचे सांगतो. चिखलदऱ्यात मोठ्या निर्मात्यांना जाण्याचे सांगणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दीपक शिर्के, रवींद्र बेर्डे आदी कलाकारही चिखलदऱ्याच्या प्रेमात पडले. त्यांनी मराठी चित्रपटासाठी यापूर्वीसुध्दा येथे काम केल्याचे सांगितले. शेवटी स्थानीय निर्मात्याच्या हिमतीची त्यांनी दाद दिली.