अखेर अमरावती शहरात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा शिरकाव
By उज्वल भालेकर | Published: January 17, 2024 06:59 PM2024-01-17T18:59:23+5:302024-01-17T19:00:07+5:30
२९ सॅम्पल पैकी जेएन-१ चे ३ तर जेएन-१.१ चे ६ रुग्ण पॉझिटिव्ह
अमरावती : देशभरात धुमाकूळ घातलेल्या कोरोनाच्या नव्या जेएन-१ आणि जेएन-१.१ या व्हेंरियटचा अमरावती शहरातही शिरकाव झाला आहे. यामध्ये जेएन-१ चे तीन रुग्ण तर जेएन-१.१ व्हेंरियटचे सहा रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे.
सध्या देशभरात कोरोनाचा नवा व्हेंरियंट जेएन-१ च्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यातही या नव्या व्हेंरियंटचे रुग्ण आढळून आल्यानंतर राज्य शासनाने आरोग्य विभागाला सतर्कतेचा इशारा दिला होता. त्याअनुषंगाने जिल्हातील आरोग्य यंत्रणाही नवा व्हेंरियंट रोखण्यासाठी सज्जय होते. मागील एक महिन्याच्या कालावधीमध्ये जिल्ह्यात ३१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते. यातच खबरदारी म्हणून आरोग्य प्रशासनाने २९ पॉझिटिव्ह रुग्णांचे अहवाल हे जेएन-१ तसेच जेएन-१.१ या नव्या व्हेरियंटचे आहेत का? याची खात्री करण्यासाठी या रुग्णांचे स्वॅब हे पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हिरोलॉजी येथे पाठविले होते. त्याअनुषंगाने आरोग्य प्रशासनाला प्राप्त झालेल्या अहवालानूसार २९ पैकी जेएन-१ चे तीन रुग्ण तर जेएन-१.१ व्हेंरियटचे सहा रुग्ण असल्याची नोंद करण्यात आली आहे. या सर्व रुग्णांची प्रकृतीमध्ये सुधारणा देखील झाली असून त्यांना रुग्णालयातून सुट्टी देखील झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी खाबरुन न जाता, कोरोना सुरक्षेच्या दृष्टीने कोविड नियमांचे पालन करण्याचे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे यांनी केले आहे.