अखेर ३० तासांनंतर 'त्या' रेल्वेमार्गावरून धावल्या गाड्या; ऐन दिवाळीत प्रवाशांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2022 09:38 PM2022-10-25T21:38:37+5:302022-10-25T21:39:10+5:30
Amravati News नागपूर मार्गावरील टिमटाळा ते मालखेड दरम्यान मालगाडीचे १७ डबे रुळावरून घसरल्याची घटना रविवारी रात्री साडेअकरा वाजता घडली. यामुळे काही प्रवासी गाड्या रद्द झाल्या तर बऱ्याच गाड्या इतर मार्गाने वळविण्यात आल्या.
अमरावती: नागपूर मार्गावरील टिमटाळा ते मालखेड दरम्यान मालगाडीचे १७ डबे रुळावरून घसरल्याची घटना रविवारी रात्री साडेअकरा वाजता घडली. यामुळे काही प्रवासी गाड्या रद्द झाल्या तर बऱ्याच गाड्या इतर मार्गाने वळविण्यात आल्या. या घटनेमुळे ऐन दिवाळीच्या आदल्या दिवशी प्रवाशांना प्रचंड मनस्ताप झेलावा लागला. मात्र, तब्बल ३० तासांनंतर मंगळवारी हावडा-मुंबई गीतांजली एक्स्प्रेस ही पहिली गाडी बडनेरा रेल्वे स्थानकाहून मुंबईकडे रवाना झाली.
कोळशाने लादलेली मालगाडी बडनेराकडे येत असताना या गाडीचे १७ डबे रेल्वे रुळावरून घसरले. या मालगाडीला एकूण ५९ डबे होते. मध्य भागातले डबे रुळावरून घसरले. या घटनेमुळे रेल्वे प्रशासनाला मध्यरात्रीपासून धावपळ करावी लागली. या दुर्घटनेमुळे काही रेल्वे गाड्या रद्द कराव्या लागल्या. भुसावळ मध्य रेल्वे विभागातील ३७ प्रवासी गाड्या भुसावळवरून खंडवा आणि बडनेरापासून नरखेडमार्गे पुढे सोडण्यात आल्या. ही घटना मध्य रेल्वे नागपूर विभागाच्या हद्दीत घडली. मालगाडी रुळावरून घसरण्याची घटना कशी घडली, हे मात्र अद्यापपर्यंत रेल्वे अधिकारी सांगायला तयार नाहीत. परंतु, प्रशासनाने युद्धस्तरावर रेल्वे मार्गाची कामे सुरळीत करून मंगळवारी सकाळी ७ वाजल्यापासून हा मार्ग वाहतुकीसाठी सज्ज केला, हे विशेष. आता नियमितपणे प्रवासी गाड्या सुरू झाल्या आहेत.