अखेर कृषी विद्यापीठाने ‘प्रमोटेड कोविड-१९’ उल्लेख वगळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2020 10:00 PM2020-07-14T22:00:16+5:302020-07-14T22:03:01+5:30
राज्यात कृषी विद्यापीठांतील बी.एस्सी. प्रथम, द्वितीय व तृतीय सत्र विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवरील ‘प्रमोटेड कोविड-१९’ हा उल्लेख वगळण्यात आला आहे. आता विद्यार्थ्यांना सुधारित गुणपत्रिका वितरित करण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : राज्यात कृषी विद्यापीठांतील बी.एस्सी. प्रथम, द्वितीय व तृतीय सत्र विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवरील ‘प्रमोटेड कोविड-१९’ हा उल्लेख वगळण्यात आला आहे. आता विद्यार्थ्यांना सुधारित गुणपत्रिका वितरित करण्यात येणार आहे. अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने संलग्न महाविद्यालयांना मंगळवारी याबाबत कळविले.
‘लोकमत’ने मंगळवारी ‘कृषी विद्यापीठात ‘प्रमोटेड कोविड-१९ गुणपत्रिका’ या आशयाची बातमी प्रकाशित केली. या वृत्ताच्या माध्यमातून कृषी पदवी अभ्यासक्रमाला असलेल्या विद्यार्थ्यांच्या व्यथा मांडण्यात आल्या. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा न घेता कृषी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना वितरित होणाऱ्या गुणपत्रिकेवर कोविड-१९ बाबत शिक्का असणार होता. तशी तयारी राज्यातील चारही कृषी विद्यापीठांनी चालविली होती. मात्र, ‘लोकमत’ने ही बातमी प्रकाशित करून कृ षी विद्यापीठांचे मनसुबे हाणून पाडले. या वृताची दखल राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी घेतली आहे. राज्य शासनाचे कोणतेही आदेश नसताना कृषी पदवी अभ्यासक्रमाला असलेल्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर ‘प्रमोटेड कोविड-१९’ उल्लेख कोणी केला, याबाबत चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई होणार असल्याचे कृषिमंत्र्यांनी घोषणा केली आहे. तसेच डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील परीक्षा विभागातील गुणपत्रिकेच्या फारमॅटवरून ‘प्रमोटेड कोविड-१९’ असा उल्लेख वगळण्यात आला आहे. मंगळवारी दिवसभर मंत्रालयातही ‘लोकमत’मध्ये प्रकाशित बातमीची चर्चा होती, हे विशेष.
कृषी विद्यापीठाचे महाविद्यालयांना नोटीस
अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने ‘प्रमोटेड कोविड-१९’ गुणपत्रिकेवर उल्लेख असल्याप्रकरणी संलग्न महाविद्यालयांना कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहेत. त्यामुळे महाविद्यालयांमध्येही एकच खळबळ उडाली आहे. कोविड-१९ असा शिक्का कृषी विद्यापीठानेच पाठविला असताना आता ‘कारणे दाखवा’ हा नवा वाद निर्माण होणार आहे. राज्य शासनाने याप्रकरणी चारही कृषी विद्यापीठांना शो-कॉज दिल्या आहेत. कृषी विद्यापीठाने ‘प्रमोटेड कोविड-१९’ असा गुणपत्रिकेवरील उल्लेख वगळला आहे. आता विद्यार्थ्यांना सुधारित गुणपत्रिका वितरित करण्यात येतील. तसे कृषी विद्यापीठातील परीक्षा विभागाने कळविले आहे.
शशांक देशमुख, प्राचार्य, श्री शिवाजी कॉलेज ऑफ हॉर्टिकल्चर