अखेर प्रभारी वैद्यकीय अधीक्षिका लीना भुतडा पायउतार
By admin | Published: November 7, 2015 12:15 AM2015-11-07T00:15:12+5:302015-11-07T00:15:12+5:30
स्थानिक ग्रामीण रूग्णालयात रूग्णांची होत असलेली गैरसोय व कर्मचाऱ्यांचा बेजबाबदारपणा व रुग्णालयातील गंभीर प्रकारच्या घटना घडत असताना ...
कारवाई : अधीक्षकांचा पद्भार मरसकोल्हे यांच्याकडे
चांदूररेल्वे : स्थानिक ग्रामीण रूग्णालयात रूग्णांची होत असलेली गैरसोय व कर्मचाऱ्यांचा बेजबाबदारपणा व रुग्णालयातील गंभीर प्रकारच्या घटना घडत असताना जिल्हा आरोग्य यंत्रणेचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. अशातच १६ आॅक्टोबरला जिल्हा शल्यचिकित्सक अरूण राऊत यांनी स्थानिक ग्रामीण रूग्णालयाला सकाळी भेट दिली. यावेळी चांदूररेल्वे येथील पत्रकारांनीच त्यांना घेराव घालून निवेदन दिले व रूग्णांची होणारी गैरसोय थांबवा तसेच बेजबाबदार अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करा अन्यथा जनआंदोलनाचा इशारादेखील दिला होता. याचाच धसका घेऊन जिल्हा शल्यचिकित्सक यांनी प्रभारी वैद्यकीय अधीक्षिकेचा पद्भार डॉ. लीना भुतडा यांच्याकडून काढून डॉ. मरसकोल्हे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
चांदूररेल्वे ग्रामीण रूग्णालयाचा भोंगळ कारभार जिल्हाभर चर्चेचा विषय बनला होता. या रूग्णालयात रूग्णांची अतिशय गैरसोय होत होती. कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे रूग्णालयात गंभीर प्रकारच्या घटना घडत होत्या.
प्रभारी वैद्यकीय अधीक्षिका लीना भुतडा यांचे रूग्णालयावर कुठल्याही प्रकारचे लक्ष नसल्याचे निदर्शनास येत होते. अशातच चांदूररेल्वे रुग्णालयात १६ आॅक्टोबरला सकाळीच जिल्हा शल्यचिकित्सक अरुण राऊत यांनी भेट दिली. यावेळी शहरातील पत्रकार रवींद्र मेंढे, प्रशांत कांबळे, विवेक राऊत, सीसीएनचे संचालक अमोल गवळी, मनीष खुणे आदींसह शरवासीयांनी ग्रामीण रुग्णालयात पोहचून शल्यचिकित्सक यांनी घेराव घातला आणि पत्रकार संघटनेकडून निवेदन देण्यात आले होते.
यावेळी लवकरात लवकर बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई व रुग्णालयाची दुरवस्था सुधारल्या गेली नसल्यास पत्रकार संघटनेच्या माध्यमातून जनआंदोलन उभारण्यात येईल आणि मागण्या पूर्ण होइपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला होता. याचाच धसका जिल्हा शल्यचिकित्सक राऊत यांनी घेत बेजबाबदार प्रभारी वैद्यकीय अधीक्षिका डॉ. लीना भुतडा यांना चांगलेच धारेवर धरले. (तालुका प्रतिनिधी)