अखेर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या ३६ इमारतींना मिळणार बांधकाम परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:10 AM2021-06-21T04:10:21+5:302021-06-21T04:10:21+5:30
फोटो - २०एएमपीएच०४ फोटो कॅप्शन - ‘लोकमत’ने १६ जून रोजी प्रकाशित केलेले वृत्त. ----------------------------------------------------------------------- महापालिका सर्वसाधारण सभेत ठराव, नगरसेवकांकडून ...
फोटो - २०एएमपीएच०४
फोटो कॅप्शन - ‘लोकमत’ने १६ जून रोजी प्रकाशित केलेले वृत्त.
-----------------------------------------------------------------------
महापालिका सर्वसाधारण सभेत ठराव, नगरसेवकांकडून सादर प्रस्तावावर शिक्कामोर्तब
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात तब्बल ६० इमारतींना बांधकाम परवानगी देण्यासंदर्भात १८ जून रोजी पार पडलेल्या महापालिका सर्वसाधारण सभेत निर्णय झाला आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात ३६ इमारतींना बांधकाम परवानगी मिळण्याचा मार्ग सुकर झाला असून, तब्बल ५० लाख रुपये बांधकाम शुल्कातून महापालिकेच्या तिजाेरीत जमा होणार आहेत.
‘लोकमत’ने १६ जून रोजी ‘अमरावती विद्यापीठात ६० इमारतींना बांधकाम परवानगी नाही’ या आशयाचे वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर विद्यापीठ प्रशासनाची भंबेरी उडाली. इमारतींना बांधकाम परवानगी मिळण्यासाठी वेगवाग हालचाली सुरू झाल्या. विद्यापीठाचे प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर, येथील बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शशिकांत रोडे यांची धावपळ सुरू झाली. यासंदर्भात महापौर चेतन गावंडे, पक्षनेता तुषार देशमुख, माजी महापौर विलास इंगोले, नगरसेवक मिलिंद चिमोटे, बंडू हिवसे आदींच्या भेटी घेऊन रोडेंनी इमारतींच्या बांधकाम परवानगीच्या समस्या सोडविण्यासाठी भूमिका मांडली. नगरसेविका प्रमिला जाधव यांनी प्रस्ताव सादर केला आणि या प्रस्तावाला नगरसेविका सुरेखा लुंगारे यांनी अनुमोदन दिले. एकमताने हा ठराव पारित झाला. त्यामुळे आता अमरावती महापालिकेच्या नगररचना विभागात ३१ वर्षांपासून रखडलेल्या ३६ इमारतींच्या बांधकाम परवानगीच्या फायलींवरील धूळ झटकली जाणार आहे. वृक्षकर रद्द करून केवळ बांधकाम शुल्क आकारले जाणार आहे. येत्या आठवड्यात प्रस्तावाची प्रत आल्यानंतर हा प्रश्न मार्गी लागेल, अशी माहिती आहे.
०००००००००००००००
विद्यापीठ इमारतींच्या बांधकाम परवानगीचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत मंजूर झाला आहे. वृक्ष करातून सूट मिळाली आहे. आता केवळ बांधकाम शुल्क आकारले जाणार असून, ३६ इमारतींना बांधकाम परवानगी मंजुरी दिली जाईल,
- प्रशांत रोडे, आयुक्त, महापालिका.