अखेर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2016 11:53 PM2016-08-13T23:53:20+5:302016-08-13T23:53:20+5:30
प्रथमेश सगणे याच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी मंगरुळ दस्तगीर पोलिसांनी अखेर शुक्रवारी रात्री अज्ञात इसमाविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला.
अमरावती : प्रथमेश सगणे याच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी मंगरुळ दस्तगीर पोलिसांनी अखेर शुक्रवारी रात्री अज्ञात इसमाविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला. सुरुवातीला प्रथमेशने स्वत:च स्वत:वर वार केल्याचा कांगावा करणाऱ्या पोलिसांना ‘लोकमत’ने केलेल्या दमदार पाठपुराव्यामुळे हा गुन्हा दाखल करावाच लागला. सामाजिक संघटनांनी आवाज बुलंद केल्याने पोलिसांवर दबाव निर्माण झाला.
दत्ता महादेव खंडारे (३१, रा. अमरावती) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी हा गुन्हा नोंदविला. तक्रारकर्ता हे प्रथमेशचे मामा आहेत. प्रथमेशवर अज्ञात व्यक्तीने धारधार शस्त्राने हल्ला करून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा उल्लेख तक्रारीत आहे. पोलिसांना त्यांच्या तपासात कुठलाही निष्कर्ष काढता न आल्याने तांत्रिक सोयीसाठी त्यांनी प्रथमेशच्या मामांकडून तक्रार मागविली. त्यानुसार भादंविच्या कलम ३०७ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. (प्रतिनिधी)
प्रथमेश पोलीस निगराणीत
पोलीस उपनिरीक्षक आणि एका पोलीस शिपायाची नियुक्ती नागपूर येथील प्रथमेशवर उपचार सुरू असलेल्या खासगी इस्पितळात करण्यात आली आहे. प्रथमेशला भेटणाऱ्यांवर त्यांची नजर आहे. प्रथमेशच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला.
प्रथमेशवर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. शाळेतील विद्यार्थी व कर्मचाऱ्यांचे बयाण नोंदविण्यात आले. प्रथमेशची प्रकृती आता धोक्याबाहेर आहे. त्याच्या बयाणावरूनच या हल्ल्याचे रहस्य उलगडेल. त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल.
- श्रीनिवास घाडगे,
पोलीस उपअधीक्षक, अमरावती