अखेर बेलोरा विमानतळाला डॉ. पंजाबराव देशमुख यांचे नाव; शिवपरिवारात आनंदोत्सव
By गणेश वासनिक | Published: January 13, 2023 03:17 PM2023-01-13T15:17:36+5:302023-01-13T15:17:59+5:30
प्रलंबित मागणी पूर्ण; शासन पत्रव्यवहार नावाचा उल्लेख, जिल्हा परिषदेत तीन वर्षांपूर्वी झाला होता ठराव पारित
अमरावती : जिल्ह्याच्या विकासात मैलाचा दगड ठरू पाहणाऱ्या बेलोरा विमानतळाला अखेर राज्य शासनाने देशाचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख असे नामकरण केले आहे. गत तीन वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेच्या सभागृहात बेलाेरा विमानतळाला डॉ. भाऊसाहेबांचे नाव देण्यासंदर्भात प्रस्ताव मंजूर करून तो शासन निर्णयार्थ पाठविण्यात आला होता, हे विशेष.
बेलोरा विमानतळाहून विमानांचे टेकऑफ या मुद्द्यावरून जिल्ह्यातील नेत्यांमध्ये राजकीय द्वंद सुरू आहे. मात्र, ११ जानेवारी रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चॉर्टर विमानाने अमरावती दौऱ्यावर आले असता ते मुंबई येथून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून बेलोरा विमानतळावर आले होते. ना. फडणवीस यांचा उपमुख्यमंत्री कार्यालयातून अधिकृत दौरा प्रशासनाला पाठविण्यात आला होता. यात उपमुख्यमंत्री फडणवीस हे व्हीटी- व्हीआरए या विमानाने डॉ. पंजाबराव देशमुख विमानतळावर आगमन करतील, असा उल्लेख
होता. त्यामळे शासनस्तरावर बेलोरा विमानतळाचे डॉ. पंजाबराव देशमुख विमानतळ असे नामकरण झाले, हे शिक्कामोर्तब केले आहे. ना. फडणवीस यांच्या विमानतळावरील दौऱ्यासंदर्भात विभागीय आयुक्त दिलीप पांढरपट्टे, जिल्हाधिकारी पवनीत कौर, निवासी उपजिल्हाधिकारी विवेक घोडके, पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, पोलिस अधीक्षक अविनाश बारगड, राज्य गुप्तवार्ता विभागाचे आयुक्त तसेच मंत्रालयाचे राजशिष्टाचार सचिव यांना कळविण्यात आला होता. बेलोरा विमानतळ हे नांदगाव खंडेश्वर तालुक्यात येत असून, डॉ. पंजाबराव देशमुख यांचे जन्मगाव पापळ हे देखील याच तालुक्यातील आहे.
विमानतळाची कामे प्रगतिपथावर
बेलोरा विमानतळाची संरक्षण भिंत पूर्णत्वास आली आहे. प्रत्यक्ष धावपट्टीचा टायरिंग कोट पूर्ण झालेला आहे. विमानतळ येथून एटीआर- ७२ प्रकारातील प्रवासी विमानाचे उडाण सुरु होणार आहे. त्याचप्रमाणे प्रशासकीय ईमारत , टर्मिनल बिल्डिंग, एटीसी टावर आदी विकासकामांसाठी ५९ कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली आहे. केवळ एजन्सी निश्चित होणे बाकी आहे.
गत तीन वर्षांपूर्वी बेलोरा विमानतळाला डॉ. पंजाबराव देशमुख यांचे नाव देण्यासंदर्भात प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावाला तीन ते चार सदस्यांनी अनुमोदन दिले होते. एकमताने हा ठराव मंजूर करून तो शासनाकडे पाठविला गेला होता. आता डॉ. पंजाबराव देशमुख यांचे नाव मिळाल्याने राज्य शासनाने खऱ्या अर्थाने भाऊसाहेबांच्या कार्याची दखल घेतली आहे.
- प्रकाश साबळे, माजी सदस्य जिल्हा परिषद, अमरावती