अखेर फिरदौसला मदरशातूनच अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2019 06:00 AM2019-11-10T06:00:00+5:302019-11-10T06:01:01+5:30
फिरदौसच्या लोकेशनच्या आधारे पोलीस मध्य प्रदेशापर्यंत पोहोचली होती; मात्र तेथून अमरावतीत परतल्यावर लालखडी स्थित मदरशातच पोलिसांच्या हाती ती लागली. या प्रकरणात शनिवारी नागपुरी गेट पोलिसांनी पीडित मुलीला मारहाण करण्यासाठी वापरलेली काठी व जियाउल्ला खानच्या कपड्यांसह घटनास्थळावरील बेडशीट जप्त केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : निवासी मदरशातील पीडित १५ वर्षीय मुलीला संस्थाध्यक्ष आरोपी जियाउल्ला खानच्या स्वाधीन करणारी महिला फिरदौस हिला अटक करण्यात अखेर नागपुरी गेट पोलिसांना शनिवारी रात्री यश मिळाले. फिरदौसच्या लोकेशनच्या आधारे पोलीस मध्य प्रदेशापर्यंत पोहोचली होती; मात्र तेथून अमरावतीत परतल्यावर लालखडी स्थित मदरशातच पोलिसांच्या हाती ती लागली. या प्रकरणात शनिवारी नागपुरी गेट पोलिसांनी पीडित मुलीला मारहाण करण्यासाठी वापरलेली काठी व जियाउल्ला खानच्या कपड्यांसह घटनास्थळावरील बेडशीट जप्त केली.
लालखडी परिसरातील या मदरशाचा संस्थाध्यक्ष मुफ्ती जियाउल्ला खान याच्या पोलीस कोठडीत चार दिवसांची वाढ झाली. पोलिसांकडून त्याची कोठडीत कसून चौकशी केली जात आहे. जियाउल्लाची सहकारी असलेली फिरदौस पसार झाल्यानंतर पोलिसांनी प्रथम अचलपूर गाठले. त्यानंतर ती मध्यप्रदेशातील रतलामला गेल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली होती. पोलिसांचे पथक तेथे पोहोचताच फिरदौस पुन्हा पसार झाली. त्यानंतर नेरपिंगळाई व अंजनगावला ती गेल्याची माहिती हाती लागली. पोलीस फिरदौसचा माग घेतच होते. शनिवारी रात्री ती लालखडी स्थित मदरशात पोहोचल्याची माहिती हाती आली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक सुलभा राऊत यांच्या पथकाने मदरशात पोहोचून फिरदौसला अटक केली. ती तिन महिन्यांपूर्वी मदरशात शिक्षक व मदतनीस म्हणून रुजू झाली होती. जियाउल्ला खानच्या ती निकट होती. तिच्याच माध्यमातून जियाउल्ला खानने पीडित मुलीला खोलीत नेले.
मदरशातील अन्य मुलींवर लैंगिक अत्याचार झाला किंवा कसे, ही बाब फिरदौसच्या चौकशीनंतर उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अर्जुन ठोसरे, उपनिरीक्षक सुलभा राऊत व प्रशांत लभाने यांचे पथक या प्रकरणाच्या तपासकामी गुंतले आहेत.