अखेर परतवाड्याचे ‘जयस्तंभ’ धाराशायी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 01:22 AM2018-02-16T01:22:13+5:302018-02-16T01:23:56+5:30
शहरातील जुन्या जयस्तंभाला बुधवारी रात्री पाडण्यात आले. वाहतुकीसाठी आता महामार्गावर वर्तुळ तयार करण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : शहरातील जुन्या जयस्तंभाला बुधवारी रात्री पाडण्यात आले. वाहतुकीसाठी आता महामार्गावर वर्तुळ तयार करण्यात येणार आहे.
परतवाडा शहरात स्वातंत्र्याचे प्रतीक असलेल्या जयस्तंभामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. आमदार बच्चू कडू यांच्या प्रयत्नाने शहरातील मिल स्टॉप ते बैतुल स्टॉपपर्यंत रस्ता चौपदरीकरणाचे काम मोठ्या प्रमाणात करण्यात आले. परिणामी जुने जयस्तंभ रस्त्याच्या एका भागात आले होते. परिणामी वाहतुकीला अडथळा व अपघाताला आमंत्रण मिळत होते. शिवतीर्थावर २६ जानेवारी रोजी आ. बच्चू कडू यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वातंत्र्य सैनिकपत्नी कमला अग्रवाल, वीरपत्नी वनमाला गेठे यांच्या हस्ते नवीन जयस्तंभाचा लोकार्पण सोहळा पार पडला. त्यामुळे शहरात दोन जयस्तंभ झाले होते. बुधवारी रात्री सार्वजनिक बांधकाम विभागाने जुने जयस्तंभ धाराशायी केले.
चौफुलीवर वर्तुळ
परतवाडा शहराच्या हृदयस्थानी असलेल्या जयस्तंभ चौकातून अमरावती, इंदूर, अकोला, बैतुल, चिखलदरा, धारणीसह अचलपूर शहर व गुजरी बाजार या शहरातील बाजारपेठेकडे मार्ग जातो. येथून चार वेगवेगळे मार्ग जात असल्याने चौफुलीवरील जुन्या जयस्तंभाच्या जागी वर्तुळ तयार करण्यात येणार आहे. त्यावर वाहतूक पोलिसांना उभे राहण्यासाठी जागा ठेवण्यात येईल.