अखेर 'न्यू अमरावती स्थानक' बनले भुसावळ विभागातील पहिले गुलाबी स्टेशन
By गणेश वासनिक | Published: August 9, 2023 06:03 PM2023-08-09T18:03:56+5:302023-08-09T18:10:15+5:30
महिला कर्मचाऱ्यांकडे ‘ए टू झेड’ व्यवस्थापन; व्यावसायिक उत्पन्न, सुरक्षा उपाय आणि गुन्हेगारी नियंत्रणावर भर
अमरवाती : मध्य रेल्वेचे 'न्यू अमरावती स्थानक' (नवी अमरावती) हे भुसावळ विभागातील पहिले गुलाबी स्थानक बनले असून ५ ऑगस्टपासून ‘ए टू झेड’ कारभाराचे व्यवस्थापन महिला कर्मचाऱ्यांच्या हाती आले आहे. महिला कर्मचाऱ्यांनी व्यावसायिक उत्पन्न, सुरक्षा उपाय आणि गुन्हेगारी नियंत्रणावर भर देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
मध्य रेल्वे मुंबई विभाग महिला कर्मचाऱ्यांना समान संधी उपलब्ध करून देण्यात नेहमीच अग्रेसर आहे. सर्व महिला व्यवस्थापित स्थानक मुंबई विभागातील माटुंगा स्थानक आणि त्यानंतर नागपूर विभागातील अजनी स्थानक स्थापन करणारे भारतीय रेल्वेचे पहिले झोन असण्याचा मान आहे.
मध्य रेल्वेने महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले असून, भुसावळ विभागातील सर्व महिला व्यवस्थापित स्थानक म्हणून न्यू अमरावती स्थानक स्थापन करण्यात आले आहे. भुसावळ विभागातील पहिले ‘पिंक स्टेशन’ आणि संपूर्णपणे महिला कर्मचाऱ्यांकडून व्यवस्थापित केले जाणारे मध्य रेल्वेचे तिसरे स्थानक ठरले आहे. न्यू अमरावती स्थानकात चार उप स्टेशन अधीक्षक, चार पॉइंट महिला, तीन रेल्वे सुरक्षा कर्मचारी आणि एक स्टेशन तिकीट बुकिंग एजंट असे एकूण १२ महिला कर्मचारी संख्या येथे कर्तव्यावर असणार आहे. नवीन अमरावती स्टेशनवर दररोज अंदाजे ३८० प्रवाशांचे अवागमन होत असून, दररोज १० रेल्वे गाड्या येथून ये-जा करतात.
नवीन अमरावती रेल्वे स्थानक ५ ऑगस्टपासून पिंक स्टेशन घोषित करण्यात आले असून, तसा कारभार सुरू झाला आहे. या रेल्वे स्थानकाहून दोन पॅसेजर गाड्या आणि वेळापत्रकानुसार लांब पल्ल्याच्या गाड्या धावतात. मालगाड्या नियमित सुरू असतात. महिलांसोबत काम करण्याचा वेगळचा आनंद आहे.
- मंजु निषाद, प्रबंधक, नवीन अमरावती रेल्वे स्थानक