अखेर वाजली शाळेची घंटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:11 AM2021-07-16T04:11:23+5:302021-07-16T04:11:23+5:30
अमरावती : गत दीड वर्षांपासून काेरोना संकटामुळे बंद असलेल्या शाळांची अखेर राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या निर्देशाप्रमाणे १५ ...
अमरावती : गत दीड वर्षांपासून काेरोना संकटामुळे बंद असलेल्या शाळांची अखेर राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या निर्देशाप्रमाणे १५ जुलै रोजी ग्रामीण भागातील ७४८ पैकी १८२ शाळांची घंटा अखेर वाजली. इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत. जिल्ह्यातील ग्रामपंचायत स्तरावरील निर्णयानुसार ७४८ शाळांपैकी केवळ १८२ शाळांमध्ये पहिल्या दिवशी उघडल्या, तर अद्याप ५६६ शाळा बंद आहेत.
शाळेच्या पहिल्या दिवशी ग्रामीण भागातील १८२ शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. आठवी ते बारावीचे वर्ग गुरुवारपासून सुरू करण्याचे निर्देश होते. त्यानुसार जिल्हा परिषदेनेही शाळा उघडण्याचे निर्देश दिले होते. प्रारंभी केवळ ग्रामीण भागातील शाळा सुरू करण्याच्या सूचना होत्या. त्यामुळे शहरी भागातील शाळा बंद होत्या. जिल्ह्यातील ७४८ पैकी १८२ शाळाच प्रत्यक्षात सुरू झालेल्या आहेत. शाळा सुरू करण्यासाठी संबंधित ग्रामपंचायतींचा ठराव आणि पालकांची संमती हे दोन निकष बंधनकारक करण्यात आले आहेत. या निकषांची पूर्तता न झाल्यामुळे काही शाळा सुरू होऊ शकल्या नाहीत. मात्र, येत्या काही दिवसांत याही शाळा आवश्यक प्रक्रिया पूर्ण करू सुरू होतील, अशी माहिती शिक्षणाधिकारी एजाज खान यांनी दिली.
बाॅक्स
शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करून बसविण्यात आले. वर्गात येताच प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातावर सॅनिटायझर देण्यात आले. मास्क वापरण्याबाबत सूचना देण्यात आल्या. राज्याच्या शिक्षण विभागाने दिलेल्या सूचनेप्रमाणे नियमांचे पालन होत आहे की नाही, याची पाहणी शिक्षण विभागाकडून काही शाळांना भेटी देऊन निरीक्षण करण्यात आले.
बॉक्स
तालुकानिहाय सुरु झालेल्या शाळांची संख्या
अमरावती ९, भातकुली ७, दर्यापूर १९, अंजनगाव सुर्जी १४, अचलपूर १३, चांदूर बाजार ४, चिखलदरा १७, वरूड २३, धारणी २४, नांदगाव खंडेश्वर ७, चांदूर रेल्वे ७, धामणगाव रेल्वे १०, तिवसा ७ व मोर्शी २१ अशा एकूण १८२.
कोट
ग्रामीण भागातील इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग गुरूवार पासून सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार संबंधित ग्रामपंचायतीने घेतलेल्या ठराव व पालकांच्या संमतीने पहिल्या दिवशी ७४८ पैकी १८२ शाळा कोविड साथीच्या पार्श्वभूमीवर आवश्यक खबरदारी घेऊन सुरू झाल्या आहेत.
ई.झेड. खान, शिक्षणाधिकारी (प्राथमिक)