अखेर बाजार समितीच्या ‘त्या’ पाच कर्मचाऱ्यांचे निलंबन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 10:14 PM2018-06-19T22:14:56+5:302018-06-19T22:15:07+5:30
आठ दिवसांपूर्वी बाजार समितीच्या आवारात अवैध गोवंश वाहतूकप्रकरणी पोलिसांनी कारवाई केलेल्या बाजार समितीच्या पाच कर्मचाऱ्यांना तातडीने निलंबित करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चांदूर बाजार : आठ दिवसांपूर्वी बाजार समितीच्या आवारात अवैध गोवंश वाहतूकप्रकरणी पोलिसांनी कारवाई केलेल्या बाजार समितीच्या पाच कर्मचाऱ्यांना तातडीने निलंबित करण्यात आले. यात दोन कार्यालयीन कर्मचारी असून, तीन रोजंदारी कर्मचारी आहेत, अशी माहिती बाजार समितीचे सभापती प्रवीण वाघमारे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी बाजार समितीचे सर्वच संचालक पत्रपरिषदेला उपस्थित होते.
बाजार समितीच्या आवारात घडलेला गोवंश अवैध वाहतुकीचा प्रकार हा बाजार समितीसाठी निंदनीय आहे. असा प्रकार बाजार समितीत पुन्हा होणार नाही, यासाठी सर्वतोपरी उपाययोजना अमलात आणल्या जातील, असे संचालकांनी सांगितले.
बाजार समिती प्रशासनाकडून अनावधानाने दुर्लक्ष झाल्यामुळे हा गैरप्रकार घडला. यामुळे ओढवलेल्या संकटाचा सामना सर्व संचालक एकजुटीने करणार आहेत, अशी ग्वाही सभापतींनी दिली. त्यांच्या या शब्दाला उपस्थित सर्व संचालकांनी एका सुरात दुजोरा दिला. यावेळी उपसभापती कांतीलाल सावकर, अरविंद लंगोटे, विनोद जवंजाळ, हरिभाऊ बोंडे, अमोल लंगोटे, मनोज नांगलिया, सत्तारखाँ, सतीश मोहोड, विलास तायवाडे, सुरेश विधाते, घुलक्षे, धोंडे इत्यादी संचालक उपस्थित होते.