...अखेर अमरावती विद्यापीठ कुलगुरू पदासाठी निघाली जाहिरात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2023 11:03 AM2023-10-16T11:03:44+5:302023-10-16T11:05:06+5:30
उमेदवारांकडून अर्ज मागविले, संकेतस्थळावर माहिती
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावतीविद्यापीठाला नऊ महिन्यांनंतरही कायमस्वरूपी कुलगुरू मिळाले नाहीत. अखेर प्रशासनाने रविवारी नव्या कुलगुरू पदासाठीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. उशिराने का होईना कुलगुरू निवडीसाठी गठित शोध व निवड समिती मात्र कामाला लागल्याचे चित्र आहे.
महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम ११ (३)(च) नुसार कुलगुरू पदासाठी विहित केलेली शैक्षणिक अर्हता व अनुभवाची पूर्तता करणाऱ्या प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ व्यक्तींकडून अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी अर्ज मागविले जाणार आहेत. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर १७ नोव्हेंबर २०२३ पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे.
त्यामुळे विलंबाने का होईना, नव्या कुलगुरू पदासाठीची प्रक्रिया सुरू झाली असल्याने येत्या वर्षात अमरावती विद्यापीठाला नवे कुलगुरू मिळतील, असे संकेत आहेत. तत्कालीन कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांचे गंभीर आजाराने २८ जानेवारी २०२३ रोजी निधन झाले. तेव्हापासून अमरावती विद्यापीठाचा प्रभारी कारभार सुरू आहे. हल्ली नांदेड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले हे अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा प्रभार सांभाळत आहे. मात्र, नांदेड ते अमरावती असा सुमारे ५०० किमीचा पल्ला गाठून कारभार हाताळणे डॉ. येवले यांना आता शक्य होत नसल्याचे चित्र आहे.
नऊ महिने कायम कुलगुरूविना...
दुसरीकडे व्यवस्थापन परिषदेने नव्या कुलगुरू निवडी प्रक्रियेसंदर्भात समिती गठित केली. मात्र, या शोध व निवड समितीचे कामकाज फारच संथगतीने सुरू आहे. परिणामी, कुलगुरू पदासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी बराच अवधी लागला. विद्यापीठाशी सुमारे ४२५ संलग्नित महाविद्यालये आहेत. नऊ महिन्यांपासून कायमस्वरूपी कुलगुरू नसल्याने विद्यापीठासह महाविद्यालयांच्या विकासासाठी ही बाब मारक ठरणारी असल्याचे पुढे आले आहे. विद्यापीठाचे घसरलेले ‘नॅक’ कसे सुधारणार, अशा अनेक विषयांवरही आता प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.