अखेर विनोद शिवकुमार याची सेंट्रल जेलमध्ये रवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:12 AM2021-04-24T04:12:52+5:302021-04-24T04:12:52+5:30
तात्पुरत्या कारागृहातील क्वारंटाईन कालावधी संपला, स्वतंत्र बराकीत मुक्काम, सुरक्षेच्या अनुषंगाने कारागृह प्रशासनाचा निर्णय अमरावती : हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी ...
तात्पुरत्या कारागृहातील क्वारंटाईन कालावधी संपला, स्वतंत्र बराकीत मुक्काम, सुरक्षेच्या अनुषंगाने कारागृह प्रशासनाचा निर्णय
अमरावती : हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येप्रकरणी अटकेतील निलंबित उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याची २० एप्रिल रोजी येथील मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली. मात्र, सेंट्रल जेलमध्ये अंतर्गत सुरक्षेच्या कारणास्तव त्याला स्वतंत्र बराकीत ठेवण्यात आले आहे.
‘लोकमत’ने १९ एप्रिल रोजी ‘विनोद शिवकुमारचा अद्यापही तात्पुरत्या कारागृहात मुक्काम’ या आशयाचे वृत्त प्रकाशित केले होते.‘चाचणी निगेटिव्ह तरी सूट कशाला?’ अशाप्रकारे प्रशासनाच्या कारभारावर ताशेरे ओढण्यात आले. त्यामुळे या वृत्ताची दखल घेत कारागृह प्रशासनाने वेगवान हालचाली केल्यात. २० एप्रिल रोजी शिवकुमार याची पुन्हा आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. निगेटिव्ह अहवाल येताच त्याच दिवशी सेंट्रल जेलमध्ये रवानगी करण्यात आली. दरम्यान जिल्हा प्रशासनानेसुद्धा शिवकुमार याला सेंट्रल जेलमध्ये न पाठविण्याच्या कारणांची मीमांसा जाणून घेतल्याची विश्वसनीय माहिती आहे.
धारणी दिवाणी न्यायालयाच्या आदेशानुसार, विनोद शिवकुमार याला ३० मार्च रोजी अमरावती येथील कारागृहात आणण्यात आले. तत्पूर्वी, त्याची कोविड चाचणी करून निगेटिव्ह अहवाल असल्याचे प्रमाणपत्र पोलिसांनी कारागृह प्रशासनाला सादर केले आणि विनोद शिवकुमार याला अंध विद्यालयात तात्पुरत्या कारागृहात ठेवण्यात आले. मात्र, त्याचा १४ दिवसांचा क्वारंटाईन कालावधी १३ एप्रिल रोजी संपुष्टात आला होता. असे असताना विनोद शिवकुमार याला मध्यवर्ती कारागृहात का पाठविले जात नाही. काही विशेष बाब म्हणून तात्पुरत्या कारागृहात ठेवण्यात येत आहे का? याबाबत शंका उपस्थित करण्यात आली होती. मात्र, अंतर्गत सुरक्षेच्या कारणास्तव सेंट्रल जेलमध्ये इतर बंदीजनांसोबत विनोद शिवकुमार याला बराकीत ठेवणे धोकादायक असल्याचा गोपनीय अहवाल कारागृह प्रशासनाला मिळाला होता. त्यामुळे क्वारंटाईन कालावधी झाल्यानंतरही २० दिवसांपर्यंत शिवकुमार याला तात्पुरत्या कारागृहात मुक्काम करावा लागला.
--------------------------
वाघ शिकार प्रकरणातील आरोपींवर नजर
मेळघाट व्याघ्र प्रकल्पातंर्गत वाघ शिकार प्रकरणातील चार आरोपी मध्यवर्ती कारागृहात जेरबंद आहेत. तसेच अन्य काही गुन्ह्यातील आरोपी धारणी तालुक्यातील आहेत. दीपाली चव्हाण यांनी २५ मार्च रोजी आत्महत्या केल्यानंतर आएफएस अधिकाऱ्यांविषयी प्रचंड रोष उफाळून आला आहे. त्यामुळे मध्यवर्ती कारागृहात सामूहिकरीत्या कैद्यासाेबत बराकीत विनोद शिवकुमार याला ठेवण्यात आले, तर राडा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विनोद शिवकुमार याला सेंट्रल जेलमधील दवाखान्याच्या मागील बाजूस तीन स्वंतत्र बराकी असून, त्यापैकी एका बराकीत त्याला जेरबंद ठेवण्यात आले आहे. सूर्योदय ते सूर्यास्त अशी तीन दिवसांपासून शिवकुमार याची दिनचर्या सुरू आहे. मात्र, वाघ शिकार प्रकरणातील आरोपींवर कारागृह रक्षकांची नजर आहे.
-------------------
आराेपी विनोद शिवकुमार याचा कोरोना दक्षतेबाबत तात्पुरत्या कारागृहातील १४ दिवसांचा कालावधी संपला आहे. त्यामुळे २० एप्रिल रोजी त्याची कोविड चाचणीअंती मध्यवर्ती कारागृहात आणण्यात आले आहे.
- रमेश कांबळे, अधीक्षक, मध्यवर्ती कारागृह