अखेर कावली, जुना धामणगाव रोडचे काम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:14 AM2021-05-25T04:14:18+5:302021-05-25T04:14:18+5:30
कावली वसाड : जुना धामणगाव मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने संबंधित विभागाने काम सुरू केले. परंतु काही महिन्यांपासून हे ...
कावली वसाड : जुना धामणगाव मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने संबंधित विभागाने काम सुरू केले. परंतु काही महिन्यांपासून हे काम बंद अवस्थेत होते. रस्त्याचे काम बंद असल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशित केल्याने संबंधित विभागाला जाग आली. अखेर सदर काम सुरू झाल्याने नागरिकांनी लोकमतचे आभार व्यक्त केले. दाभाडा ते जुना धामणगाव या चार किलोमीटर अंतरात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. लोकमतने चार किलोमीटरच्या अंतरात पाचशेच्यावर खड्डे अशा आशयाचे वृत्त प्रकाशित केले होते. याची दखल घेऊन रस्त्याचे खडीकरण करण्यात आले. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने हे काम मजुरांअभावी बंद पडले आहे. दरम्यान अधिकच खड्डे पडल्याने छोटे-मोठे अपघात झाले. त्यामुळे पुन्हा लोकमतने वृत्त प्रकाशित केले. पुन्हा संबंधित विभागाने खड्डे बुजविण्याचे आदेश दिले. ते खड्डे बुजविले गेले असले तरी त्या रस्त्यावर डांबरीकरण होणे गरजेचे आहे.
कावली ते जुना धामणगाव या रस्त्याने चिंचपूर, वसाड, शिदोडी, पिंपळखुटा आधी गावांचे नागरिक धामणगाव रेल्वे येथील मुख्य बाजारपेठ येत असल्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याचे वृत्तसुद्धा लोकमतने प्रकाशित केले असता, रस्त्याचे काम सुरू झाल्याने लोकमतचे सर्वत्र आभाव व्यक्त केला जात आहे.
१० ते १२ वर्षांपूर्वी कावली येथील दवाखाना बंद अवस्थेत होता. लोकमतने याबाबत वृत्त प्रकाशित होताच प्रशासनाने दवाखाना पूर्ववत सुरू केला. याच ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. अशातच सात वर्षांपूर्वी गावांमध्ये डायरियाची लागण झाली. नागरिक आजारी पडू लागले. लोकमतने याविषयी वृत्त प्रकाशित केल्यानंतर विभागाने लाखो रुपयांची पाणीपुरवठा योजना गावांत आणून पाण्याची समस्या कायमची मिटविली. त्यामुळे सामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे.