झोलाछाप पशुवैद्यकीय डॉक्टरांकडून शेतकऱ्यांची आर्थिक लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:09 AM2021-07-23T04:09:42+5:302021-07-23T04:09:42+5:30
ना डिग्री ना नोंदणी तरी म्हणे आम्ही डॉक्टर अनिल कडू परतवाडा : झोलाछाप स्वयंघोषित बोगस पशुवैद्यकीय डॉक्टरांकडून संपूर्ण राज्यात ...
ना डिग्री ना नोंदणी तरी म्हणे आम्ही डॉक्टर
अनिल कडू
परतवाडा : झोलाछाप स्वयंघोषित बोगस पशुवैद्यकीय डॉक्टरांकडून संपूर्ण राज्यात शेतकऱ्यांची, पशुपालकांची आर्थिक लयलूट होत आहे.
कुठल्याही शासकीय दप्तरी डॉक्टर म्हणून यांची नोंद नाही. त्यांना सरकारी नोकरीही नाही किंवा सेवकही नाहीत. असे असतानाही कामबंदचे हत्यार उपसून आम्ही काम करणार नाही, आमच्यावर कारवाई केल्या जाणार आहे, तुम्ही तुमच्या सरकारी डॉक्टरांना बोलवा, असे सुचवून पशुपालकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रकार ते करीत आहेत. स्वतःच्या बाजूने पशुपालकांची सहानुभूती ते मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत.
यात पशुसंवर्धन विभागातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचे मोबाईल नंबर मर्जीतील पशुपालकांकडे देऊन या अधिकाऱ्यांना ते त्या पशुपालकांकडून त्रस्त करीत आहेत. एकामागोमाग एक प्रश्न उपस्थित करून आपले सरकारी क्षेत्रीय डॉक्टर हजर नाहीत. आता पशू मरणार, पशू मेले, या प्रकारच्या तक्रारी ते पशुपालक या उच्चपदस्त अधिकाऱ्याकडे करीत आहेत.
अजब गजब
राज्यात सर्वत्र या झोलाछाप स्वयंघोषित बोगस डॉक्टरांवर पशू वैद्यकीय परिषदेने आक्षेप घेतला आहे. त्यांच्याविरुद्ध कारवाई प्रस्तावित केली आहे. असे असतानाही जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी अमरावती यांनी खासगी पदविकाधारकांना कृत्रिम रेतन, लसीकरण, खच्चीकरण व प्राथमिक औषधोपचाराकरिता शासकीय ओळखपत्र देण्याचा घाट घातला आहे.
अम्ब्रेला ट्रिटमेंट
या स्वयंघोषित बोगस झोलाछाप खासगी पशुवैद्यकीय डॉक्टरांना औषधीचे प्रिस्क्रिप्शन लिहिण्याचा अधिकार नाही. डॉक्टर उपाधीदेखील लावण्याचा अधिकार नाही. यात हे अम्ब्रेला ट्रिटमेंट प्रमाणे वाटेल ते औषध गरज नसताना देतात. या औषधांचे डोस त्यांना माहीत नाहीत. आजार कोणत्या जिवाणूमुळे झाला याचे ज्ञान नाही. कोणते औषध गाभण जनावरांना तर कोणते औषध दुधाळ जनावरांना द्यायचे हेही माहीत नाही. दुधात किती ड्रग रेसिडू येतात याचे ज्ञान नाही. यात ड्रग रेझिस्टन्स डेव्हलप होतात याची माहिती नाही. मानव जातीत सुद्धा ट्रान्समिट होणारे सुपर बग निर्माण होतात हे माहीत नाही. असे असतानाही जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी अमरावती यांनी या अशा लोकांना ओळख पत्र देऊन प्राथमिक उपचाराची संधी उपलब्ध करून देणे निश्चितच आक्षेपार्ह आहे.