अमरावतीतील सोलर चरखा समूहातून महिलांना आर्थिक बळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 11:20 AM2018-09-20T11:20:31+5:302018-09-20T11:22:27+5:30

विदर्भातील कापसाला योग्य भाव आणि ग्रामीण भागात रोजगाराचे दालन उपलब्ध व्हावे, यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत अमरावतीत पायलट प्रोेजेक्ट म्हणून सोलर चरखा समूह स्थापन करण्यात आला.

Financial Strength for Women From Amravati Solar Charkha Group | अमरावतीतील सोलर चरखा समूहातून महिलांना आर्थिक बळ

अमरावतीतील सोलर चरखा समूहातून महिलांना आर्थिक बळ

Next
ठळक मुद्देपायलट प्रोजेक्टची राज्यात दखलमहाखादी ब्रॅन्डच्या नावे तयार कापडाची विक्री

गणेश वासनिक
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : विदर्भातील कापसाला योग्य भाव आणि ग्रामीण भागात रोजगाराचे दालन उपलब्ध व्हावे, यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत अमरावतीत पायलट प्रोेजेक्ट म्हणून सोलर चरखा समूह स्थापन करण्यात आला. सूत तयार करण्याच्या या उपक्रमातून महिलांना आर्थिक बळ मिळत आहे. याची राज्यात दखल घेतली असून, चांद्यापासून बांद्यापर्यंत हा उपक्रम राबविण्यासाठी शासनादेश जारी झाला आहे.
या प्रकल्पाची सन २०१५-२०१६ या वर्षांपासून पायाभरणी करण्यात आली. अमरावती जिल्ह्यात १४ गावांत १४६ महिलांना सोलर चरखे वाटप झाले आहे. आतापर्यंत २०० महिलांना थेट रोजगार उपलब्ध झाला आहे. जिल्ह्यात दरवर्षी पाच हजार किलो सुताचे उत्पादन घेतले जात आहे. अमरावती, जळगाव व कामठी येथील एमआयडीसी आणि छत्तीसगड राज्यात हे सूत पाठविले जात आहे. धारणीलगतच्या पाच गावांमध्ये एक कोटी ५२ लाख रूपयांच्या निधीतून घुटी येथे नव्याने सामूहिक प्रकल्प उभारण्यात आला आहे. शासनाने मंत्रालय ते शासकीय कार्यालयांमध्ये खादी आॅफिस शर्टची विक्रीसाठी पुढाकार घेतला आहे. ई-कॉमर्स व डिलर्सच्या माध्यमातून ‘महाखादी ब्रॅन्ड’च्या नावे खादी प्रेमींना विविध नावीण्यपूर्ण दर्जेदार खादी उत्पादने तयार करून ती विक्री केली जात आहे. अमरावतीत पायलट प्रोजेक्ट यशस्वी झाल्यानंतर आता चंद्रपूर येथे ८.१३ कोटीतून नवा प्रकल्प नावारूपास आणला जात आहे. राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार हे प्रयत्नशील आहे. शासनाने खादीचे तयार कापड विक्रीसाठी झांशी, बारामती येथील विघ्नहर्ता कंपनीसोबत सामंजस्य करारदेखील केला आहे. मुंबई व पुणे येथील संकुलात खादीचे तयार कापड विकले जाते. आॅनलाईन व माकेर्टिंगवर अधिक भर दिला जात आहे.

राष्ट्रपतींच्या हस्ते सोलर चरखा मिशनचे शुभारंभ
केंद्र सरकारचा देशात ५० खादी क्लस्टर उभारण्याचा मानस आहे. त्याअनुषंगाने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते २७ जून २०१८ रोजी सोलर चरखा मिशनचा शुभारंभ झाला. येत्या काळात गाव-खेड्यात १ लाख सोलर चरखे वाटप केले जाणार आहेत. यात महाराष्ट्राला विशेष प्राधान्य मिळणार आहे.

अमरावती एमआयडीसीत ५ कोटींचा नवा प्रकल्प
शासनाच्या औद्योगिक समूह विकास कार्यक्रमांतर्गत अमरावती येथील एमआयडीसीच्या नव्या संकुलात चरख्यापासून कच्चा माल व कापड प्रक्रिया प्रशिक्षण केंद्र साकारले जाणार आहे. त्याकरिता शासनाने ५ कोटी १० लाख रूपये मंजूर केले आहे. मेळघाटात मानव विकास मिशन अंतर्गत १०० चरखे आणि १० लूम उभारणीसाठी मान्यता मिळाली आहे.

सोलर चरखा समूहातून वर्षाअखेर एक हजार महिलांना रोजगार उपलब्ध होईल. अमरावतीच्या चरखा खादी पायलट प्रोजेक्टची राज्यात दखल घेण्यात आली आहे. नव्या खादी क्लस्टरमध्ये अमरावतीला प्राधान्य आहे.
- प्रदीप चेचरे,
जिल्हा खादी ग्रामोद्योग अधिकारी, अमरावती

Web Title: Financial Strength for Women From Amravati Solar Charkha Group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.