चांदूर रेल्वेत वरमंडपी ५० हजारांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:13 AM2021-05-06T04:13:14+5:302021-05-06T04:13:14+5:30
लग्नकार्यात संचारबंदीतील नियमांचे उल्लंघन, महसूल, नगर परिषद, पोलीस विभागाची संयुक्त कारवाई चांदूर रेल्वे : संचारबंदीत लग्नप्रसंगी दिलेल्या नियमांचे उल्लंघन ...
लग्नकार्यात संचारबंदीतील नियमांचे उल्लंघन, महसूल, नगर परिषद, पोलीस विभागाची संयुक्त कारवाई
चांदूर रेल्वे : संचारबंदीत लग्नप्रसंगी दिलेल्या नियमांचे उल्लंघन करणे वरपक्षाला चांगलेच भोवले. मंगळवारी रात्री ११ च्या सुमारास स्थानिक महसूल, नगर परिषद व पोलीस विभाग यांनी संयुक्त कारवाई करीत त्यांच्याकडून ५० हजारांचा दंड वसूल केला.
प्राप्त माहितीनुसार, चांदूर रेल्वे शहरातील रामनगरमधील एका व्यक्तीच्या घरी मुलाच्या लग्नाच्या पहिल्या दिवशीचा कार्यक्रम मंगळवारी धूमधडाक्यात सुरू होता. सदर माहिती पोलीस ठाण्याला मिळताच सर्वप्रथम ठाणेदार मगन मेहते सहकाऱ्यांसह सदर घरी रात्री ९.३० वाजता पोहोचले. या कार्यक्रमात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने लागू असलेल्या संचारबंदीतील नियमांचे उल्लंघन झाल्याचे पहावयास मिळाले. काही वेळातच महसूल विभाग व नगर परिषदेची चमूसुद्धा तेथे पोहोचली. यानंतर रात्री ११ वाजता ५० हजार रुपये दंडाची पावती नगर परिषदेकडून फाडण्यात आली व धनादेशाच्या स्वरूपात दंडसुद्धा वसूल करण्यात आला. या कारवाईमध्ये नगर परिषद कर्मचारी जितेंद्र कर्से, राजेश शिर्के, महसूल विभागाचे कर्मचारी सतीश गोसावी, श्रीराम वानखडे, पोलीस कर्मचारी रामेश्वर राठोड, पंकज शेंडे, अरुण भुरकाडे आदींचा सहभाग होता.
चांदुरातील पहिली कारवाई
लॉकडाऊनच्या काळात अनेक ठिकाणी लग्नकार्य सुरू आहेत. याप्रसंगी नियमांचे उल्लंघन दृष्टीस पडत आहे. मात्र, मंगळवारी पहिल्यांदाच आर्थिक दंडाची कारवाई तालुक्यात करण्यात आली.